आदिवासी अस्मितेच्या लढ्याचे महानायक धरती आबा बिरसा मुंडा यांना अमळनेरमध्ये अभिवादन!
आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम; आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवरही चर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) :ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्षाची मशाल पेटवून जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा उभारणारे महान आदिवासी क्रांतिकारक, स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी योद्धे आणि आदिवासी अस्मितेचे प्रतीक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीतील अन्यायकारक शोषणकारी व्यवस्थेविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून उलगुलान अर्थात महान उठावाचे नेतृत्व केले. आदिवासींचे पारंपरिक अधिकार, संस्कृती, स्वाभिमान आणि जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांचा संघर्ष हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरोधातील व्यापक परिवर्तनाचा संदेश देणारा आहे.
या अभिवादन कार्यक्रमाला नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मा. नगरसेवक सलीम टोपी, मा.नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रविण बैसाणे,पत्रकार ईश्वर महाजन, आदिवासी नेते आप्पा दाभाडे, मुकेश बिऱ्हाडे, दयाराम मोरे (बहादरवाडी),विनोद मोरे(खडके), सुदाम वाघ (कलाली), सुधाकर बागुल (कलाली), सुरेश भिल (देवळी), राजेंद्र वाघ (देवळी), रामदास ढालवाले, पप्पू लोंढे, रमेश सोनवणे (मुडी), दशरथ पवार (दरेगाव), वसंत जाधव, ज्योतीबाई पारधी, उषाबाई भिल, हिराबाई पारधी, कु.कल्याणी पारधी, रमेश लोंढे, प्रभू कसबे, भावराव फुलपगारे आणि मोतीराम हातांगडे यांच्यासह आदिवासी विकास सामाजिक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजासमोरील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच रोजगारासंबंधी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे, आरोग्य सुविधा सक्षम होणे, युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे आणि आदिवासींच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण होणे, या विषयांवर उपस्थितांनी आपापली मते मांडली.