साईबाबा विद्यालयामध्ये १८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी
👤 बदनापूर प्रतिनिधी :- नवनाथ गव्हाणे |
📅
15 November 2026 |
👁 17 Views
बदनापूर :-अकोला (नि.), ता. बदनापूर येथील साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तब्बल १८ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकदा एकत्र येत या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या वर्गमित्रांना आणि गुरुजनांना भेटताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळत होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील मस्ती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील संस्मरणीय प्रसंग सांगितले. आपल्या आजच्या यशात शाळेचा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यासाठी योगेश शेळके,जगन्नाथ खुरमुटे, सुनिल मुंढे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. गजानन डोईफोडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. संस्थेचे मार्गदर्शक श्री. बळीराम गिते, संस्थेचे अध्यक्ष श्री. गजाननभाऊ गीते व सचिव सौ. सुनीता गीते यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून माजी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना शाळेतील जुन्या आठवणींचा पट उलगडला गेला. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या शिक्षकांचा यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा लवकरच भेटण्याचा संकल्प केला. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.