जळगाव विशेष प्रतिनिधी
जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज (शनिवारी) सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना समोर आली आहे. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. जळगाव शहरासह भुसावळ, वरणगाव, सावदा, मुक्ताईनगर, रावेर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळच्या वेळेस नागरिक आपापल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतानाच अचानक जमीन हादरल्याची जाणीव झाली. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचे नागरिकांनी सांगितले, तर काही नागरिकांना घराला किंवा इमारतीला हादरे बसल्याचा अनुभव आला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली. तर सोशल मीडिया आणि फोन कॉलच्या माध्यमातून एकमेकांकडून घटनेची माहिती घेतली जात होती.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकाच वेळी धक्के जाणवल्याची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भूकंपाबाबत भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः सकाळच्या वेळी घरांमध्ये असलेल्या नागरिकांना या धक्क्यांचा अनुभव आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच मालमत्तेचे किंवा सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दरम्यान, भूकंपाची नेमकी तीव्रता किती होती, भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता आणि त्याची खोली किती होती, याबाबतची अधिकृत तांत्रिक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित यंत्रणांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर भूकंपाबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवल्यास घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
**जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आजची सकाळ भूकंपाच्या अनपेक्षित धक्क्यामुळे चर्चेचा विषय ठरली असून, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही