*मा. उच्च न्यायालयाच्या विनंतीचा आणि न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेचा सन्मान राखत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरत्या स्वरूपात स्थगित; मागण्यांच्या पूर्ततेपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार*
👤 शुभम सुराणा जळगाव |
📅
18 November 2026 |
👁 9 Views
जळगाव ( विषेश प्रतिनिधी)
प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप, मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व वरिष्ठ न्यायाधीशांसोबत झालेल्या सकारात्मक विचारविनिमयानंतर आणि मा. उच्च न्यायालयाच्या विनंतीचा सन्मान राखून चारही राज्यस्तरीय महासंघांनी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाशी सुसंगत भूमिका घेत, समस्त जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेनेही संस्थेच्या शिस्तीचा मान राखून तात्पुरत्या स्थगितीस सहमती दर्शविली असून, सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कर्तव्यावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
*निर्णयामागील पार्श्वभूमी व न्यायालयीन विनंतीचा सन्मान*
सदर संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेता, मा. उच्च न्यायालयाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व प्रशासकीय आदेश पारित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संवेदनशील परिस्थितीत मा. उच्च न्यायालयाने महासंघाच्या शिष्टमंडळाला पाचारण करून संवाद साधला. शासनाने दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत न्यायालयीन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देत मा. उच्च न्यायालयाने संप तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची विनंती केली. तसेच, लघुलेखक संघटनेचे महासंघाचे अध्यक्ष श्री. ढवळे साहेब यांनीही मागण्यांच्या पूर्ततेबाबत ठाम विश्वास व्यक्त केला.
न्यायसंस्थेचा आणि मा. उच्च न्यायालयाच्या शब्दाचा मान राखत चारही महासंघांनी एकत्रितपणे संप तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला व तशा आशयाचे लेखी निवेदन मा. प्रबंधक (प्रशासन), मा. उच्च न्यायालय यांना सादर केले.
*जिल्हा संघटनेची भूमिका व कर्मचाऱ्यांचा सामूहिक निर्णय*
शासन निर्णय (GR) निर्गमित झाल्याशिवाय संप मागे न घेण्याच्या भूमिकेवर जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी सुरुवातीपासून ठाम होते आणि आजही आहेत. महासंघाच्या अचानक घेतलेल्या निर्णयाची सखोल खातरजमा केल्यानंतर, जळगाव व भुसावळ येथील चारही संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष विचारविनिमय केला. मा. उच्च न्यायालयाच्या विनंतीचा आदर राखून काही दिवसांसाठी संपास तात्पुरती स्थगिती देण्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने संमती दर्शविली.
*लढा संपलेला नाही; संघटनात्मक शिस्त कायम ठेवण्याचे आवाहन*
हा संप यशस्वी करण्यामागे जळगाव जिल्ह्यासह सर्व तालुक्यांतील अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक आणि प्रत्येक न्यायालयीन कर्मचाऱ्याचे योगदान, त्याग व अभेद्य एकजूट कारणीभूत ठरली आहे. "संप केवळ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झाला असून, न्याय्य मागण्यांचा लढा अद्याप संपलेला नाही. जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित होऊन अंतिम न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनात्मक शिस्त, संयम आणि एकजूट कायम ठेवावी," असे आवाहन समस्त जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.