दैनिक आखुर / संतोष एडके तासगाव
द्राक्षबागांसाठी वापरण्यात येणारे लोखंडी वाय आकाराचे अँगल चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून एका बालअपचारीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ५०९ लोखंडी अँगल, महिंद्रा बोलेरो पिकअप आणि टाटा ट्रक असा एकूण ३० लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तासगाव तालुक्यातील जरंडी येथील शेतजमिनीत ठेवलेले द्राक्षबागेचे ५०९ लोखंडी वाय आकाराचे अँगल १८ जून २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी प्रविण भिमराव पाटील (रा. पळशी, ता. खानापूर) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते.
दरम्यान, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पथकातील पोलीस हवालदार सोमनाथ गुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत ठाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीचे लोखंडी अँगल विक्रीसाठी महिंद्रा पिकअप आणि टाटा ट्रकमधून तासगाव येथील बेद्री चौकात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेद्री चौक परिसरात सापळा रचला. यावेळी महिंद्रा पिकअप आणि टाटा ट्रक घेऊन आलेल्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी जरंडी येथील शेतातून द्राक्षबागेचे लोखंडी वाय अँगल चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस अभिलेख तपासल्यानंतर संबंधित चोरीचा गुन्हा तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी प्रशांत बाळासो शिंदे (वय ३१, रा. मुळगाव आरवडे सध्या राहणार जोतिबानगर, भिवघाट रोड, तासगाव), सुयश काकासो जाधव (वय २३, रा. पळशी, ता. खानापूर) आणि अविकुमार विश्वास मलमे (वय ३०, रा. नागाव-निमणी, ता. तासगाव) यांना ताब्यात घेण्यात आले असून एका बालअपचारीचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.
पोलिसांनी २ लाख ३ हजार ६०० रुपये किमतीचे ५०९ लोखंडी अँगल, ८ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप आणि २० लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक असा एकूण ३० लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेतलेले तिघे आरोपी, बालअपचारी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.