बदनापूर : राज्यातील देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत 'थाळी बजाव' आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन होणार असून, देवस्थान इनाम जमीन कृती समितीने याबाबतची घोषणा केली आहे.
१९५३ च्या कायद्यानुसार इतर सर्व इनामे खालसा झाली असली, तरी देवस्थान इनाम जमिनी अद्यापही 'वर्ग-२' मध्येच असल्याचा मुद्दा कृती समितीने उपस्थित केला आहे. यामुळे इनामधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवताना अडचणी येत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
जोगळेकर मॅन्युअल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या जमिनींवर पुजारी, अर्चक, गुरव आणि सनदधारक इनामदारांचाच अधिकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी वारस नोंदी आणि विरासत कार्यवाही वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीत इनामधारक शेतकऱ्यांचा एकही प्रतिनिधी समाविष्ट नसल्याचा आक्षेप कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता एकतर्फी कायदा होण्याची भीतीही समितीने व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार करूनही शासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.