बदनापूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या बदनापूर तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विलास खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ. विलासराव मोरे यांच्या मान्यतेने जालना जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांनी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.ग्राहकांचे हक्क आणि हितांचे संरक्षण करणे, ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणे, ग्राहकांची होणारी आर्थिक फसवणूक रोखणे, बाजारपेठेतील अनियमिततेविरोधात आवाज उठविणे, तसेच शासकीय व खासगी सेवा क्षेत्रातील ग्राहकांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातत्याने कार्यरत आहे.या पार्श्वभूमीवर विलास खैरे यांच्यावर बदनापूर तालुकाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यात ग्राहक चळवळीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करावे, तसेच तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांनी केले.विलास खैरे यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, ग्राहक हिताच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सजग ग्राहक • सशक्त समाज • समर्थ भारत