खंडोबाच्या माळ परिसरातील घटना; मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला, ओळख पटविण्याचे आवाहन
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. कुची येथील खंडोबाच्या माळ परिसरात असलेल्या विकास पुंडलिक पवार यांच्या विहिरीमध्ये शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास ग्रामस्थांना हा मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही.
विशेष म्हणजे, यापूर्वीही कुची येथील स्मशानभूमीच्या पाठीमागील एका विहिरीत अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्या विहिरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दाट झाडी आणि काटेरी झुडपे असल्याने विहिरीकडे सहसा कोणाचे लक्ष जात नव्हते. आता पुन्हा त्याच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंडोबाच्या माळ परिसरातील संबंधित विहिरीच्या आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असल्याने विहिरीमध्ये नेमके काय आहे, हे सहजपणे दिसून येत नाही. त्यामुळे हा मृतदेह किती दिवसांपासून विहिरीत होता, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. परिसरातील किंवा अन्य गावांतील कोणाची व्यक्ती बेपत्ता असेल, तर त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कुची परिसरात पुन्हा विहिरीत मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचा सखोल तपास करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे.
धड