गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप

👤 आकाश दडस सातारा | 📅 27 July 2026 | 👁 42 Views
गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप
गुरुपौर्णिमेपूर्वी स्वच्छतेची मागणी; अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक गोंदवले येथे येणार असताना, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व हायस्कूल परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील दवाखाना, शाळा व सार्वजनिक रस्त्यांच्या परिसरात प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर घनकचरा उघड्यावर साचलेला असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, "कृपया येथे कचरा टाकू नये" असे फलक लावलेले असतानाही त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गुरुपौर्णिमेच्या काळात हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी गोंदवले येथे येतात. मात्र त्यांचे स्वागत स्वच्छ वातावरणाऐवजी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी होत असल्याने गावाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामस्थ राहुल पाटील यांनी सांगितले की, "संबंधित प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून स्वच्छतेची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. कचऱ्यामुळे भाविक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हायस्कूलच्या स्वच्छतागृह परिसरातही उघड्यावर प्लास्टिक कचरा पडलेला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दवाखान्यालगत कचरा साचल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. तसेच शाळेच्या परिसरातील कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


गुरुपौर्णिमेपूर्वी तातडीने संपूर्ण परिसराची स्वच्छता करून नियमित कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ राहुल पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे ग्रामस्थांसह भाविकांचेही लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण |