*भडगाव (विशेष प्रतिनिधी)*:
"हर बच्चे का बचपन हम सबकी जिम्मेदारी" हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेवून भावी पिढीला कायदेविषयक संरक्षणाचे कवच देण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, भडगाव यांच्या वतीने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, भडगाव येथे आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिराची तीन प्रबोधनपर पुष्पांनी उत्साहात सांगता झाली.
२६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान विद्यालयात पार पडलेल्या या ज्ञानसत्रात तज्ज्ञ विधीज्ञांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक हक्क, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो कायदा), सायबर सुरक्षितता आणि बालविवाह प्रतिबंध यांसारख्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
तीन दिवस, तीन विचारपुष्पे: विधीज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन
*पहिले पुष्प (२६ ऑक्टोबर)*: 'मेरा बचपन मेरा अधिकार' या विषयावर ॲड. घनश्याम मोरे यांनी पहिले पुष्प गुंफले. त्यांनी बालकांचे मूलभूत हक्क आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर अधिकारांची सविस्तर मांडणी केली.
*दुसरे पुष्प (२७ ऑक्टोबर)*: 'कानून जानो बचपन बचाओ' या विषयावर ॲड. हेमंत कुलकर्णी यांनी दुसरे पुष्प गुंफताना बालकांवरील अत्याचार, पॉक्सो कायदा व कायदेशीर संरक्षण प्रणाली यावर विद्यार्थ्यांना सजग केले.
*तिसरे पुष्प (२८ ऑक्टोबर)*: 'सुरक्षित क्लिक सुरक्षित बचपन' या विषयावर ॲड. निलेश तिवारी यांनी तिसरे पुष्प गुंफत आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सायबर गुन्हेगारी आणि इंटरनेटवरील सुरक्षिततेचे धडे दिले.
*मान्यवरांची उपस्थिती व सहभाग*
या तीन दिवसीय उपक्रमाच्या सांगता समारंभास न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक अभिजीत दायमा, ॲड. सोनवणे, समांतर विधी सहाय्यक विठ्ठल पाटील यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्या छाया बिर्हाडे, देवेंद्र पाटील सर, तायडे सर, सोनजे सर, कर्मचारी आयास मुल्ला आणि डिगराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्राचार्या छाया बिर्हाडे व मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचे स्वागत करण्यात आले.