एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी
👤 संतोष एडके तासगाव |
📅
07 September 2026 |
👁 84 Views
तासगाव : धनगर समाजाच्या विविध समाजहिताच्या मागण्यांसाठी तासगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासह विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शासनाने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, ही प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याशिवाय मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकला ‘हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर’ हे नाव तातडीने देण्यात यावे, तसेच या नामकरणाची आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत अधिसूचना जारी करावी, अशी मागणी करण्यात आली.
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला ‘राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्यात यावे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
दरम्यान, श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची स्वतंत्र, उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी एसआयटीमार्फत सुरू असल्यास ती तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांचे स्पेशल ऑडिट किंवा फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
तसेच श्री करवीर निवासिनी अंबामाता महालक्ष्मी देवस्थानासाठी स्वतंत्र, सक्षम व पारदर्शक देवस्थान कायदा करण्यात यावा. यासाठी स्वतंत्र कायदा २०१८ किंवा पंढरपूर व शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर सक्षम कायदेशीर व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.
धनगर समाजाच्या या विविध मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या हक्कांच्या व समाजहिताच्या प्रश्नांसाठी एकजुटीने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.
यावेळी तासगाव तालुक्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात तासगाव येथे उपस्थित होते.