धारदार कोयत्याने एसटी बसवर हल्ला; जखमी अवस्थेतही पोलिसाने दोन हत्यारबंद आरोपींना पकडले. पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर गंभीर जखमी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 26 August 2026 | 👁 270 Views
धारदार कोयत्याने एसटी बसवर हल्ला; जखमी अवस्थेतही पोलिसाने दोन हत्यारबंद आरोपींना पकडले.  पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर गंभीर जखमी



मिरज : एसटी बस अडवून बसच्या काचा फोडत चालक व वाहकावर धारदार कोयत्याने हल्ला करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील हत्यारबंद गुन्हेगारांना महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस अंमलदारांनी धाडसाने ताब्यात घेतले. आरोपींना पकडताना पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र, स्वतः जखमी होऊनही त्यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही आरोपींना ताब्यात घेत एसटी चालक व वाहकाचा जीव वाचविला.
ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड गेटसमोर, मिरज येथे घडली.
अब्दुलरेहमान अख्तर पटेल आणि सैफुल्ला अख्तर पटेल, दोघेही रा. उस्मानिया मोहल्ला, भारतनगर, मिरज, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अब्दुलरेहमान पटेल हा पोलिस रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सुबराव सरगर आणि धनंजय शिवाजी घुबडे हे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना मार्केट यार्ड गेटसमोर दोन इसम एसटी बस अडवून चालक व वाहकाला मारहाण करताना दिसले. आरोपींनी हातात धारदार कोयते घेतले होते. त्यांनी एसटी बसच्या काचा फोडल्या तसेच वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर व धनंजय घुबडे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आरोपींकडे धारदार शस्त्रे असूनही त्यांनी जिवाची पर्वा न करता दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपींनी सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
मात्र, जखमी अवस्थेतही सरगर यांनी धैर्य न गमावता प्रसंगावधान राखले आणि अत्यंत धाडसाने दोन्ही हत्यारबंद आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या या कर्तव्यदक्षता, समयसूचकता आणि धाडसामुळे एसटी चालक व वाहक यांचा जीवघेण्या हल्ल्यातून बचाव झाला.
या धाडसी कामगिरीबद्दल सांगली जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर यांचे कौतुक केले असून, एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या प्रकरणी एसटी चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. २७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १३२, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस अंमलदार धनंजय घुबडे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १२१(२), १३२, ३(५) प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे आणि पोलिस उपनिरीक्षक बसवराज हर्डीकर करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, मिरज शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |