ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर

👤 श्रीरामपूर गौरव डेंगळे | 📅 02 August 2026 | 👁 452 Views
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर
६०० हून अधिक विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद; परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याचा दिला संदेश
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आर्थिक अडचणी कितीही असल्या तरी मनात जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची तयारी असेल तर यशाचे शिखर गाठता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील भेंडा येथील कबड्डीपटू शंकर गदई. ऊसतोड कामगार कुटुंबातून आलेल्या शंकर गदई यांनी शेतमजुरी करत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कबड्डीची साधना सुरू ठेवत गावच्या मैदानापासून महाराष्ट्राच्या संघापर्यंत, महाराष्ट्राच्या कर्णधारपदापासून प्रो कबड्डी लीगपर्यंत आणि आता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या याच संघर्षमय प्रवासाची कहाणी सोमैया विद्या विहारच्या श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील इयत्ता आठवी ते दहावीच्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून थेट संवाद साधत ऐकली.इयत्ता सातवीपासून कबड्डी खेळण्यास सुरुवात केलेल्या शंकर गदई यांच्यासमोर सुरुवातीपासूनच अनेक अडचणी होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण आणि कबड्डीची साधना सुरू असतानाच त्यांना शेतमजुरी करावी लागली. दिवसाला सुमारे ३०० रुपये मजुरी मिळत असतानाही त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही. दिवसभर कष्ट करून मिळालेल्या पैशातून संसाराला हातभार लावत रात्री आणि उपलब्ध वेळेत कबड्डीचा सराव करणाऱ्या शंकर गदई यांनी परिस्थितीला शरण न जाता त्याच परिस्थितीला आपल्या यशाची ताकद बनविले.गावपातळीवरील स्पर्धांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि महाराष्ट्र कबड्डी संघाचे कर्णधारपदही भूषविले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि मैदानावरील कामगिरीच्या जोरावर त्यांना प्रो कबड्डी लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी तेलुगू टायटन्स आणि गुजरात जायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व करत व्यावसायिक कबड्डीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील खेळाडूने देशातील प्रतिष्ठेच्या व्यावसायिक कबड्डी व्यासपीठावर पोहोचणे हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानाचा क्षण ठरला.
शंकर गदई यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांची २०२३-२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी कबड्डी या क्रीडा प्रकारात निवड केली. ग्रामीण मातीतून घडलेल्या या खेळाडूच्या संघर्षाला मिळालेला हा सन्मान त्यांच्या कष्टाची आणि जिद्दीची पोचपावती ठरला आहे. विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीबरोबरच शंकर गदई यांनी व्यावसायिक जीवनातही यश मिळविले असून ते GST विभागात अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. खेळ आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शंकर गदई यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, कबड्डीची सुरुवात, महाराष्ट्र संघातील अनुभव, कर्णधारपद, प्रो कबड्डी लीगमधील प्रवास आणि शिवछत्रपती पुरस्कारापर्यंतचा टप्पा अत्यंत मनमोकळेपणाने सांगितला. ग्रामीण भागातील मुलांमध्ये नैसर्गिक क्रीडा कौशल्य मोठ्या प्रमाणात असते; मात्र त्याला योग्य दिशा, मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. परिस्थितीवर मात करण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आणि मेहनत या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून पटवून दिले.क्रीडा क्षेत्राकडे केवळ छंद म्हणून न पाहता त्यामध्येही उत्तम करिअर घडविता येते, असा महत्त्वपूर्ण संदेशही शंकर गदई यांनी विद्यार्थ्यांना दिला. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच पदकविजेत्या खेळाडूंना शासनाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणासह विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी आणि आपल्या आवडत्या खेळात सातत्याने मेहनत करावी, असे आवाहन त्यांनी केले.शंकर गदई यांच्या संघर्षमय प्रवासाने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून त्यांच्या संवादात सहभागी होत विविध प्रश्न विचारले. एका सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेला तरुण आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करू शकतो, राज्य संघाचे नेतृत्व करू शकतो, प्रो कबड्डी लीगमध्ये खेळू शकतो आणि शिवछत्रपती पुरस्कारासारखा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवू शकतो, हे शंकर गदई यांच्या प्रवासातून विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट झाले.
भेंड्याच्या ग्रामीण मातीतून सुरू झालेला शंकर गदई यांचा हा प्रवास आज केवळ अहिल्यानगर जिल्ह्याचाच नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “परिस्थिती अडथळे निर्माण करू शकते; मात्र जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर त्या अडथळ्यांवर मात करून यश मिळविता येते,” हा संदेश शंकर गदई यांनी आपल्या जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांसमोर ठेवला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |