राणेंची हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही - परशूराम उपरकर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 155 Views
राणेंची हुकूमशाही आम्ही  चालू देणार नाही - परशूराम उपरकर
अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील अणुऊर्जा प्रकल्प रोखण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करेल भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी देशातील लोकशाही संपविण्याचा विडाच उचलला
देवगड-मुणगे येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा होत असलेला विरोध आणि त्यासंदर्भात खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार तथा शिवसेना नेते परशूराम उपरकर यांनी आज तीव्र टीका केली. राणेंची हुकूमशाही आम्ही इथे चालू देणार नाही. अणुऊर्जा प्रकल्पविरोधातील आंदोलनात शिवसेना सक्रियपणे सहभाग घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच सत्ताधारी भाजप आणि शिंदे शिवसेनेचे खासदार लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. कणकवली येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. उपरकर म्हणाले, देवगड-मुणगे येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिकांची घरे, बागायती आणि उपजीविकेची साधने बाधित होणार असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. मात्र, प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना "फटके देऊ" अशी भाषा खासदार नारायण राणे करत आहेत. लोकशाहीत अशा प्रकारची भाषा अयोग्य असून ती निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

अणुऊर्जा प्रकल्पामुळे वीज निर्मिती होऊन भविष्यात मोठे उद्योग येतील आणि रोजगार निर्माण होईल, असा दावा खासदार राणे करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ काम करताना त्यांनी सिंधुदुर्गात किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, याचे उत्तर त्यांनी द्यावे, तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प गेल्या बारा वर्षात त्यांना का सुरू करता आला नाही याचेही उत्तर त्यांनी द्यावे असे आव्हानही उपरकर यांनी दिले.

स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. या केंद्राचे भूमिपूजन ही नारायण राणे यांनी केले होते. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प उभाच राहिला नाही. त्या प्रशिक्षण केंद्राचे काय झाले, याचे उत्तर राणे यांनी प्रथम द्यावे आणि त्यानंतरच अणुऊर्जा प्रकल्पामुळे रोजगार मिळेल, अशा घोषणा कराव्यात, असा टोला त्यांनी लगावला.

श्री. उपरकर म्हणाले, यापूर्वीही सिंधुदुर्गातील विविध प्रकल्पांच्या संदर्भात खासदार राणे यांनी अशाच प्रकारची हुकूमशाहीची भाषा केली होती. मात्र, अशा वक्तव्यांना शिवसेना भीक घालणार नाही. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील आणि हा प्रकल्प रोखण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित अणऊर्जा प्रकल्पामळे सिंधुदुर्ग सह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे प्रभावित होण्याची शक्यता असल्याचा दावा करताना त्यांनी हापूस आंबा बागायती, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावरही त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली. मच्छीमारी आणि बागायतदारांची उपजीविका धोक्यात आणणारा तसेच संपूर्ण देवगड तालुक्याचे नुकसान करणारा अणुऊर्जा प्रकल्प आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शिंदे शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत गेलेल्या संजय पाटील यांनी पाच-पाच खून आणि बॉम्ब टाकण्याची भाषा केली असून भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी देशातील लोकशाही संपविण्याचा विडाच उचलल्याची टीकाही श्री. उपरकर यांनी केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |