‘मुक्तसंवाद’ कार्यक्रम मालिकेतील तिसरे पुष्प ; ३० मे रोजी आयोजन
गोविंद गोडबोले यांच्या कथाकथनाचा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड येथील बर्वे लायब्ररी नजीकच्या स्नेहसंवर्धक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.‘मुक्तसंवाद’ या शीर्षकाखाली वर्षभरात दर महिन्याला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे एकूण बारा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, साहित्यिक गोविंद गोडबोले यांचे कथाकथन हे या कार्यक्रम मालिकेतील तिसरे पुष्प ठरणार आहे.
मिरज येथील रहिवासी असलेले गोविंद गोडबोले यांनी नागपूर, पुणे आणि रत्नागिरी येथील आकाशवाणी केंद्रांवर अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते सेवानिवृत्त असून विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. विशेषतः बालसाहित्य निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या साहित्यिक कार्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमाबाई बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर तसेच देवगड पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर यांनी केले आहे.
ही माहिती ग्रंथपाल प्रशांत शं. बांदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.