बामणोलीत अनधिकृत धार्मिक बांधकामावर प्रशासनाची कारवाई
👤 राहुल टिबे सांगली |
📅
25 May 2026 |
👁 264 Views
मिरज तालुक्यातील बामणोली-दत्तनगर येथील भूमापन क्रमांक १५/४/८ मधील अनधिकृत समाज भवनचे अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस प्रशासनाने नष्ट करण्याची कारवाई आज केली. सांगली अपर तहसीलदार अध्विनी वरूटे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, बामणोली-दत्तनगर येथील भूमापन क्रमांक १५/४/८ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. चौकशीत वादग्रस्त जागेमध्ये जिल्हाधिकारी सांगली यांनी दि. 13 जून 1994 रोजी दिलेला आदेश बिनशेती आदेश रहिवास कारणासाठी मंजूर केलेला आहे. तथापि, सध्याचे भुखंडमालक यांनी त्यावर जमियतखाना म्हणजेच समाज भवनाचे बांधकाम सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करून शर्तभंग केल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशांमध्ये धार्मिक स्थळांच्या बांधकामास सुरूवात करण्यापूर्वी गृह विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र व धार्मिक स्थळांच्या अनधिकृत बांधकामास आळा घालण्याबाबत सविस्तर सूचना आहेत. त्याअनुषंगाने कोणतीही परवानगी अथवा कार्यवाही संबंधित भूखंडधारकांनी केलेली नाही. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54 व 55 च्या अनुषंगाने अध्यक्ष, हजरत अबुबक्कर (रजी) जमियतखाना, दत्तनगर बामणोली यांना सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीशिवाय सुरू केलेले जमियतखाना म्हणजेच समाज भवनाचे बांधकाम त्वरित काढून टाकावे व अनाधिकृत वापर त्वरित थांबवावा असे नोटीसीव्दारे कळवून नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत कार्यवाही करावी, अन्यथा अनाधिकृत बांधकाम काढून टाकण्यात येईल व त्यासाठी येणारा खर्च संबंधिताकडून वसूल करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. अनधिकृत बांधकाम तात्काळ हटविण्याच्या सूचना देऊनही कार्यवाही न झाल्याने आज दिनांक 25 मे 2026 रोजी पोलीस व ग्रामपंचायत बामणोली प्रशासनाच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, सांगली अपर तहसीलदार अश्विनी वरूटे, मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, नायब तहसिलदार मनोहर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, मंडळ अधिकारी अमित काळे, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद कुंभार, ग्रामसेवक सचिन पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.