विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशी समर्थकांची मागणी
विधानपरिषदेच्या सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे फायरब्रॅण्ड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचे नाव विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून चर्चेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्ष संघटनेत सक्रिय काम, ग्रामीण भागातील संपर्क आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी नेतृत्व या पार्श्वभूमीवर ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.ब्रह्मानंद पडळकर यांनी समाजकल्याण सभापती पदाच्या कार्यकाळात सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. समाजकल्याण विभागाच्या सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी दिला आहे. ब्रम्हानंद पडळकर यांनी सांगली सातारा जिल्ह्यात भेटीगाठीवर भर दिला असून उठबस वाढवली आहे. कार्यकर्त्यांनीदेखील ब्रह्मानंद पडळकर यांनी
विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ब्रम्हानंद पडळकर हे ताकतीने उतरणार ? याकडे पडळकर समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत. ब्रम्हानंद पडळकर यांनी निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने गाठीभेटीवर भर दिला आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यात ब्रम्हानंद पडळकर यांनी नेटाने जनसंपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमांच्यानिमित्ताने गावागावात भेटी देऊन निवडणूकीची साखरपेरणी सुरू केली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. तर माजी समाजकल्याण ब्रह्मानंद पडळकर यांनी गेल्या दोन वर्षापासून सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये चांगला जनसंपर्क वाढवला असून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात ब्रह्मानंद पडळकर यांनी उतरावे यासाठी पडळकर समर्थकांनी ताकदीने यंत्रणा सज्ज केली आहे.
भाजपकडून आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, विविध स्तरांवरून ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावाला पसंती मिळत आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले काम, तसेच कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आली आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, पडळकर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांत भाजपकडून उमेदवारीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांनाही वेग आला असून, ब्रह्मानंद पडळकर यांच्या उमेदवारीसाठी पडळकर समर्थकांनी नेतृत्वाकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची काम करण्याची शैली, जनतेसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि सामान्य माणसाला दिलासा देण्याची ताकद यामुळे युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. “बाहुबली” या नावाने युवकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. सामान्य माणसाचे कोणतेही काम असो, एखादी अडचण असो किंवा शासनदरबारी अडकलेला प्रश्न असो, “एक फोन करा आणि काम मार्गी लागेल” त्यामुळे पडळकर बंधू म्हणजे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. राजकारणात जनतेच्या प्रश्नांवर थेट बोलणारे, संघर्ष करणारे आणि शेवटच्या माणसासाठी काम करणारे नेतृत्व कमी होत चालले आहे. अशा काळात ब्रम्हानंद पडळकर साहेबांसारख्या तळागाळातील नेतृत्वाला विधानपरिषदेत संधी मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत बहुजन समाजातून व्यक्त होत आहे.
सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना संधी मिळाल्यास बहुजन समाजाचा आवाज विधानभवनात अधिक ताकदीने पोहोचेल, असा विश्वास पडळकर समर्थक व्यक्त करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षशील कार्यपद्धतीला आणि ब्रम्हानंद पडळकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला मिळालेली जनतेची पसंती भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते, अशी भावना आहे. त्यामुळे सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ब्रम्हानंद पडळकर यांना विधानपरिषदेत संधी द्यावी, अशी मागणी पडळकर समर्थकांतून होत आहे.