आटपाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते विलासराव खरात यांच्या गाजलेल्या ‘आकुबा आणि इतर कथा’ या कथासंग्रहाचा आता कन्नड भाषेत अनुवाद होणार आहे. कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. कुंभार हे या पुस्तकाचे कन्नड भाषांतर करणार असून, यामुळे माणदेशी साहित्याला आंतरराज्यीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.
ग्रामीण जीवन, लोकसंस्कृती आणि मातीतल्या माणसांचे वास्तववादी चित्रण असलेल्या ‘आकुबा’ कथासंग्रहाने अल्पावधीतच साहित्यविश्वात वेगळी छाप निर्माण केली आहे. सन २०२५-२६ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले होते.
दरम्यान, या कथासंग्रहाला पुणे येथील राज्यस्तरीय ‘गावगाडा साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आटपाडी आणि डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन समिती यांच्या वतीने आटपाडी येथील ऐतिहासिक श्री कलेश्वर मंदिर परिसरात विलासराव खरात यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
मा. अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘आकुबा’ कथासंग्रहाचा कन्नड भाषेत अनुवाद होणार असल्याने सांगली जिल्ह्यासह सीमाभागातून विलासराव खरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.