कणकवली उड्डाणपुलाखालील जागेत सुशोभीकरण व विकासकामे सुरु करणार

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 232 Views
कणकवली उड्डाणपुलाखालील जागेत सुशोभीकरण व विकासकामे सुरु करणार
उद्यान,योगा केंद्र, साहित्यिक कट्टा,जाॅगिंग ट्रॅक आदींची होणार उभारणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती उड्डाणपुला खालील श्रीधर नाईक चौक ते प्रांत कार्यालय समोरील पहिला टप्पा हाती घेणार पहिल्या टप्प्यातील १.२१ कोटींची कामे लवकरच सुरु
गेली अनेक वर्षे मागणी आलेली कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील जागा आता नगरपंचायत च्या ताब्यात आली आहे. उड्डाणपुलाखाली भंगार वाहने, हॉटेल्स, भाजी-फळ विक्रेते, ट्रक, टेम्पो, खासगी बसेस यांचे अतिक्रमण हटवून तिथे उद्यान, वाचनालय, साहित्यिक कट्टा, छोटा रंगमंच, बॅडमिंटन कोर्ट, योगा केंद्र, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी विरंगुळा केंद्र, कोकण संस्कृती दर्शन आदी सुविधा उभारण्याचे काम कणकवली नगरपंचायतीने हाती घेतले आहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तर पहिल्या टप्प्यातील १.२१ कोटीच्या कामांची निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच या कामांचा शुभारंभ होणार आहे अशी माहिती कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील जागा गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण, भंगार वाहने, अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकली आहे. महिनोन्महिने उभी राहणारी भंगार वाहने, हॉटेल आणि
व्यावसायिक आस्थापनांकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी, ट्रक, टेम्पो, खासगी बसेस तसेच भाजी आणि फळ विक्रेत्यांमुळे पुलाखालील परिसर कायम गजबजलेला आणि अस्ताव्यस्त राहिलाय. यामुळे शहराचे विद्रूपीकरण देखील होत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबवली की काही दिवस हा परिसर मोकळा होतो. त्यानंतर महिन्याभरात पुन्हा अतिक्रमण सुरू राहते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून कणकवली नगरपंचायतीने आता उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करून तेथे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या योजनेअंतर्गत उड्डाणपुलाखालील जागेत उद्यान, वाचनालय, साहित्यिक कट्टा, छोटा रंगमंच, बॅडमिंटन कोर्ट, योगा व ध्यानधारणा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, मुलांसाठी खेळण्याची जागा, कोकण संस्कृती दर्शन, सेल्फी पॉइंट आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.

या सर्व प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. कणकवली शहरातील गडनदी ते जानवली नदीदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील ४४ पिलरच्या दुतर्फा हा विकास आराखडा राबवला जाणार आहे. प्रत्येक गाळ्यामध्ये कोणत्या सुविधा उभारता येतील, याचा
सविस्तर आराखडा तज्ज्ञांच्या माध्यमातून तयार केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेचा नागरिकांना उपयुक्त आणि आकर्षक पद्धतीने वापर व्हावा, हा नगरपंचायतीचा उद्देश आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ लवकरच होणार असून त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. श्रीधर नाईक तिठा ते प्रांत कार्यालय या परिसरातील उड्डाणपुलाखाली जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी उद्यान, बैठक व्यवस्था आदी सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपंचायतीने १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदाही मंजूर झाली असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

उड्डाणपुलाखालील जागा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित येत असल्याने याठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यात अनेक अडचणी येत होत्या. महामार्ग विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसताना नगरपंचायतीलाही त्या जागेवर थेट कारवाई करता येत नव्हती. त्यामुळे सुमारे पाच वर्षांपूर्वी नगरपंचायतीने उड्डाणपुलाखालील जागा विविध सार्वजनिक सुविधांसाठी नगरपंचायतीच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी महामार्ग विभागाकडे केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी महामार्ग विभागाने या मागणीला मंजुरी
दिली. त्यानंतर नगरपंचायतीने टप्प्याटप्प्याने विकासकामे सुरू केली.

या अंतर्गत शहरातील डीपी रोड आणि बसस्थानक परिसरात उड्डाणपुलाखाली दोन सुसज्ज प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. आता त्यापुढील टप्प्यात श्रीधर नाईक तिठा ते प्रांत कार्यालय या परिसरात उद्यान आणि अन्य सुविधा उभारल्या जाणार आहेत.

साऊंडप्रूफ योगा आणि ध्यानधारणा केंद्र

शहरातील कलाकारांसाठी छोटे नाट्यगृह

दोन ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट

दोन ठिकाणी सेल्फी पॉइंट

कोकण संस्कृती दर्शविणारे कलादालन

आधुनिक व्यायामशाळा

१४०० मिटर पिलर दुतर्फा जॉगिंग ट्रॅक

तीन ठिकाणी सुसज्ज प्रसाधनगृहे

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

छोट्यांसाठी खेळाचे मैदान,वाचनालय आणि साहित्यिक, राजकीय कट्टा अशा संकल्पना अमलात आणण्यात येणार असल्याचे श्री पारकर यांनी सांगितले. तसेच प्रत्येक ठिकाणी ठराविक दुचाकी पार्किंग साठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |