पं. स. सदस्या धनश्री मराठे यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून तात्काळ 100 केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्या धनश्री हेमंत मराठे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, कुडाळ यांना निवेदन सादर केले.मळेवाड गावातील मसूरकरवाडी, नाईकवाडी, हेदुलवाडी या भागांमध्ये एकाच लाईनवर वीजपुरवठा होत असल्याने कमी दाबाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी घरगुती उपकरणे, शेती पंप तसेच व्यावसायिक उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्यरत राहत नाहीत. ग्रामपंचायतीचा नळपाणी पुरवठा पंपही सुरळीत चालत नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरे अंतर्गत सावळवाडी, केरकरवाडी, शिरसाटवाडी, चराटकरवाडी, मुरकरवाडी, परबवाडी आणि राणेवाडी परिसरातही कमी दाबामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी सध्या असलेला 25 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून तातडीने 100 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कमी दाबामुळे वारंवार तक्रारी येत असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून सर्व वाड्यांतील वीज समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी धनश्री मराठे यांनी केली आहे.