परळी वैजनाथ येथे मराठा भवनासाठी २८ गुंठे जागा मंजूर
परळी वैजनाथ येथे मराठा भवनासाठी २८ गुंठे जागा मंजूर धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यशपरळी वैजनाथ शहरात मराठा भवन उभारण्यात यावे, ही सकल मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या वतीने मराठा भवनासाठी तब्बल २८ गुंठे जागा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मराठा समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर व आंदोलनानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदेने मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली.
मराठा भवनाच्या माध्यमातून समाजासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून, भविष्यात हे भवन समाजाच्या एकतेचे व प्रगतीचे केंद्र ठरणार असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.
या निर्णयाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून, आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व समाजबांधवांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच आंदोलनकर्त्यांच्या संघर्षाला मानाचा मुजरा करण्यात आला.