आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
पाथर्डी शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीतून ही विकासकामे साकार होत असून, विकसित व समृद्ध पाथर्डीकडे टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की, “सुंदर, आधुनिक, पायाभूत सुविधांनी सुसज्ज आणि सांस्कृतिक वैभव जपणारे पाथर्डी घडवण्याचे स्वप्न महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.”
या कार्यक्रमात शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये रंगार गल्ली येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर संभामंडपाचे उद्घाटन, दूधशितकरण केंद्र ते हंडाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, बालवे वस्ती ते साखरे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, खंडोबामाळ येथील खुल्या जागेस संरक्षक भिंत उभारणी, नाथनगर येथील नवनाथ आंधळे घर ते शेवगाव रोड रस्ता काँक्रीटीकरण, मोहटादेवी हॉस्पिटल ते शेवगाव रोड काँक्रीटीकरण, विजयनगर परिसरातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण तसेच श्री संतसेना महाराज मंदिर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.
शहराचा सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पायाभूत विकास साधण्यासाठी महायुती सरकारकडून सातत्याने निधी उपलब्ध करून दिला जात असून, भविष्यातही पाथर्डीच्या विकासात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा विश्वासही आमदार राजळे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी पाथर्डी शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पाथर्डीकर नागरिक उपस्थित होते.