झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 June 2026 | 👁 240 Views
झाराप रेल्वे स्टेशनवरुन  हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक
झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे.याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश उमेश बर्डे यांना दिले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे ट्रेन दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य माती वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा व अपघाताच्या भयाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी M.I.D.C. क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल |