तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा
👤 संतोष एडके तासगाव |
📅
25 July 2026 |
👁 234 Views
तासगाव शहरातील गुरुवार पेठेतील कुंभार बंधूंचे सुमारे १५० वर्षांची परंपरा लाभलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. अनेक पिढ्यांपासून अखंडपणे सुरू असलेली पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि भक्तीची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात असून, हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थानाबरोबरच तासगावच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक बनले आहे.
मंदिरात श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या सुंदर, सुबक आणि आकर्षक मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या स्थापनापासून आजपर्यंत एकही दिवस नियमित पूजा-अर्चेत खंड पडलेला नाही. कुंभार बंधूंच्या वंशपरंपरेने ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली असून, हीच या मंदिराची सर्वात मोठी ओळख मानली जाते.
वर्षभराfल धार्मिक उत्सव आणि नित्याचे आध्यात्मिक वातावरण
वर्षभरातील प्रत्येक एकादशीला मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी अभिषेक, महापूजा, महाआरती, तर सायंकाळी हरिनाम भजनाने मंदिर परिसर भक्तिमय होतो. श्रीकृष्ण जन्माष्टीमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सात घटस्थापना करून देवीची आराधना केली जाती, तसेच दिवाळी पाडव्यापासून सलग एक महिना दररोज पहाटे काकड आरतीची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. तसेच मंदिर परिसर भगवान महादेवाची पिंड असून, कुंभार बंधूंचे पूर्वज तुकाराम बुवा कुंभार यांची समाधीही येथे आहे.
जीर्णोद्धारामुळे वास्तूला येणार नवे रूप
श्रद्धा, सेवा, भक्ती आणि परंपरेचा अखंड दीप तेवत ठेवणारे गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे तासगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अनमोल वैभव आहे. काळाच्या ओघात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची वास्तू जीर्ण झाल्याने तिच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे मूळ स्वरूप, पारंपरिक वास्तुशैली आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य कायम राखत संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. प्रस्तावित जीर्णोद्धारामुळे या पवित्र वास्तूला नवे रूप प्राप्त होणार असून, तासगावच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळणार आहे.