सांगली जिल्हाधिकारी डॉ. मैनांक घोष यांच्या आदेशानुसार तसेच प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यातील मौजे देशमुखवाडी येथे महसूल प्रशासनाने आज पहाटे अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष धडक कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या कारवाईचे नेतृत्व तहसीलदार शितल बंडगर यांनी केले. कारवाईदरम्यान चालक वाहन सोडून पळून गेल्यानंतर तहसीलदार बंडगर यांनी स्वतः चालकाच्या सीटवर बसून वाहन ताब्यात घेत कारवाई यशस्वी केली. त्यांच्या या धाडसी भूमिकेची परिसरात मोठी चर्चा रंगली.
या मोहिमेत नायब तहसीलदार दत्तात्रय दीक्षित, प्रकाश सगर, ग्राम महसूल अधिकारी विनायक बालटे, नितीन नाईक, नितीन सानप, प्रशांत जाधव, अमीर मुल्ला, साहिल पाटील, अरुण ऐनापुरे, बालाजी कांबळे, संजय माने, बाबुराव पाटील आणि इस्माईल कांबळे यांनी सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळी एक डंपर आणि एक जेसीबी दिसून आली. महसूल पथक पोहोचताच संबंधितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये डंपर ताब्यात घेण्यात आला, मात्र जेसीबी नदीतील चिखलातून पळवून नेण्यात आली. संबंधित जेसीबी मालकाची स्थानिक पातळीवर चौकशी सुरू असून वाहनावर नियमानुसार कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पहाटेच्या सुमारास झालेल्या या अचानक धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी अशा धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत.