आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
खानजोडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम रविवारी पार पडला. समाजहिताची जाणीव ठेवत संतोष शिंदे यांच्या पुढाकारातून शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य दादा मोठे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत पाटील, लोकनियुक्त सरपंच संभाजी माने, अजित चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमन अरुण सूर्यवंशी, प्रगतशील डाळिंब बागायतदार प्रकाशभाऊ सूर्यवंशी, तसेच संतोष शिंदे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सूर्यवंशी मॅडम, अंगणवाडीच्या नीता मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत मगर, ज्येष्ठ नागरिक जालिंदर सूर्यवंशी तसेच ग्रामस्थ, पालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. उपस्थितांनी या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.