सांगली जिल्ह्यामध्ये काही पान पट्टी चालक-मालक दुकानदारांना 'मोका' (MCOCA) कायद्याची भीती घालून, त्यांना विनाकारण त्रास देऊन आर्थिक मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायकारक आणि बेकायदेशीर वसुलीच्या विरोधात आज महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ आणि सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी झालेल्या भेटीत महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षकांसमोर शहरात आणि जिल्ह्यात पान दुकानदारांना वेठीस धरण्याच्या सुरू असलेल्या घटनांचा सविस्तर पाढा वाचला. दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा प्रकारच्या खंडणीखोर प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची स्वतः गंभीर दखल घेण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, कार्याध्यक्ष युसुफ जमादार यांच्यासह राजू पागे, मयूर बांगर, मकरंद जमदाडे, प्रकाश मोरे, लिंबाजी कांबळे, सुरेश जाधव, अजिंक्य पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पान व्यावसायिक उपस्थित होते.