संगमनेर (प्रतिनिधी).
निमोण-समनापूर गटातील जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणाऱ्या, सामाजिक कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कविता कैलास पाटील या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी इच्छुक म्हणून चर्चेत आल्या आहेत. सध्या त्या भाजपा महिला मोर्चा संगमनेर तालुका अध्यक्षा म्हणून कार्यरत असून, जनसेवा आणि संघटन बांधणीच्या जोरावर त्यांनी परिसरात विश्वासार्ह नेतृत्व उभे केले आहे.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या विचाराने प्रेरित होऊन कविता पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी त्यांनी निस्वार्थीपणे काम केले आहे.
शिक्षण आणि सामाजिक जाणीवांचा संगम
पदवीधर व उच्चशिक्षित असलेल्या कविता पाटील यांना समाजकारणाची विशेष आवड आहे. "९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण" या भूमिकेतून त्या जनतेच्या प्रश्नांवर काम करतात. महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, गरजू नागरिकांचे हक्क आणि ग्रामीण विकास हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र राहिले आहे.
विखे पाटील गटाचा विश्वास, भाजपाचे सक्षम नेतृत्व
गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्यांचे कुटुंब विखे पाटील गटासोबत कार्यरत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. नव्या पिढीतील प्रभावी महिला नेतृत्व घडविण्याचे काम पक्षाने त्यांच्या माध्यमातून केले आहे.
महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी धडपड
बचतगटांचे सक्षमीकरण, बांधकाम कामगारांचे प्रश्न, लाडकी बहीण योजना, रेशन, बालसंगोपन योजना तसेच विविध शासकीय कार्यालयांमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नागरिकांना थेट मार्गदर्शन केले आहे. तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय, जनसेवा कार्यालय तसेच महायुती कार्यालयांपर्यंत पाठपुरावा करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका
शेतकरी आणि शेती हा कविता पाटील यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वीज, पाणी, रस्ते, सिंचन, पीकविमा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. भविष्यात अधिक व्यापक पातळीवर शेतकरी हितासाठी काम करण्याची त्यांची भूमिका स्पष्ट आहे.
विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका
२०२४ च्या संगमनेर विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. भाजपाच्या विकासवादी धोरणांचा प्रचार करताना त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रभावी काम केले. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे महिला आणि युवकांमध्ये पक्षाचा जनसंपर्क वाढण्यास मदत झाली.
जनतेसाठी समर्पित भविष्यातील संकल्प
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कविता पाटील यांनी विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याण या विषयांना प्राधान्य देत जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
"जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला तर निमोण-समनापूर गटातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. मी राजकारणासाठी नाही, तर समाजकारणासाठी या क्षेत्रात आले आहे. जनतेची सेवा हेच माझे ध्येय आहे."कविता कैलास पाटील