येथील उमाबाई बर्वे लायब्ररी आणि तालुका पेन्शनर्स असोसिएशन, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मुक्तसंवाद’ या उपक्रमातील तिसरे पुष्प मिरज (जि. सांगली) येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी आकाशवाणी केंद्र अधिकारी श्री. गोविंद गोडबोले यांच्या भावस्पर्शी कथाकथनाने गुंफले गेले. त्यांच्या अनुभवसमृद्ध कथनाने उपस्थित श्रोत्यांना जीवनमूल्यांचा वेध घेत विचारप्रवृत्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बर्वे लायब्ररीचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे यांच्या हस्ते श्री. गोडबोले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर, तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर, सचिव विलास करंजेकर, स्नेहसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष चारूदत्त सोमण, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. गणेश (भाई) बांदकर, सचिव सिताराम पाटील, सदस्य दत्तात्रय जोशी तसेच सदस्या सौ. मधुरा कुबल उपस्थित होत्या.
श्री. गोडबोले यांनी आकाशवाणी केंद्रात कार्यरत असताना आलेले विविध अनुभव, सहकाऱ्यांशी जुळलेली मैत्री, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यश-अपयश आणि नातेसंबंध यांची सुरेख गुंफण आपल्या कथाकथनातून उलगडली. विविध सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्ती एकत्र येऊन कशा प्रकारे जिव्हाळ्याचे नाते निर्माण करतात, याचे हृद्य चित्रण त्यांनी केले.
बालसाहित्याविषयी बोलताना त्यांनी मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिल्याचा उल्लेख केला. बालसाहित्य हे मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे आणि संस्कार घडविणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. कथा, कविता, बालनाट्य यांसारख्या साहित्यप्रकारांमधून मुलांना आनंदाबरोबरच जीवनमूल्यांचे शिक्षण मिळते. मुलांवर लहान वयातच वाचनसंस्कार रुजविणे आवश्यक असून मुलांना काय वाचायला द्यायचे याचा विचार पालकांनी सजगपणे करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बालसाहित्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान श्रोत्यांशी संवाद साधताना प्रभावी कथाकथन कसे करावे, यासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण टिप्स त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर यांनी केले. उपाध्यक्ष डॉ. गणेश (भाई) बांदकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सौ. मधुरा कुबल यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. परूळेकर यांनी मानले.
या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, ज्येष्ठ नागरिक आणि वाचनप्रेमी श्रोत्यांची बहुसंख्य उपस्थिती लाभली.