'वसप' : कृष्णाकाठची समृद्ध कथा. -श्रीकांत देशमुख, नांदेड.

👤 आखुर साहित्यसंपदा टिम | 📅 01 June 2026 | 👁 197 Views
'वसप' : कृष्णाकाठची समृद्ध कथा. -श्रीकांत देशमुख, नांदेड.
कधीतरी इस्लामपूर बारामती भागात सलग काही दिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो तेव्हा त्याची भेट झालेली. विजय जाधव, धर्मवीर पाटील, विष्णू पावले, अन्वर हुसेन असे अनेक खूप महत्वाचे लेखन करणारे कवी-लेखक-चित्रकार या परिसरात आहेत. विशेष म्हणजे हे लेखक नुसते लेखन करीत नाहीत, तर शेती, जीव जित्राब देखील मनापासून जपतात. वस्तीवर राहतात, म्हणजे शेतीत राबून शेतीतल्या दुःखावर, आनंदावर, आशा-निराशेवर लिहिणारे हे लोक आहेत. ही बाब उर्वरित मराठी भाषिक प्रदेशात तशी कमीच पहायला मिळते. एक नकळत भुमिनिष्ठता त्यांच्या देहमनात रुजल्यासारखी असते. महादेव मानेबद्दल काही नोंदवताना या बाबी समजून घेणे मला अगत्याचे वाटते.
कारण मी जेव्हा त्याच्या वस्तीवर गेलो तेव्हा महादेव आपल्या गाईला चारापाणी करत कुरवाळत होता, वांगी तोडत होता. लेखकाने मातीपासून दूर पळण्याने होणारे मराठी भाषेचे नुकसान खूप मोठे आहे. महादेव, विजय जाधव यांच्यासारखे लेखक त्याला अपवाद आहेत, म्हणूनच त्यांचे लेखन देखील समजून घ्यायला हवे, असे वाटते. ‘वसप’ हा २०२३ साली प्रकाशित झालेला महादेवचा कथासंग्रह. एकूण दहा कथा या संग्रहात आहेत. मध्यम आकाराच्या या कथा. कुठेही समजून घेण्याची फार गुंतागुंत नसलेल्या, कुठल्याही प्रायोगिकतेचा सोस नसणाऱ्या, अगदी खरोखरच एखादी गोस्ट सांगत जावी तश्या या कथा आहेत. हेतुपूर्वक काही शैलीविषयक प्रयोग करणे असो की निवेदनातील कृत्रिमता याचा विचार न करता सुचल्या तश्या लिहिलेल्या ह्या कथा आहेत. म्हणूनच त्या अतिशय नैसर्गिक वाटत जातात. कुठलाही अभिनिवेश न बाळगता लेखक या संग्रहातून काही गोष्टी सांगत जातो. त्याच्या कथांचे विषय हे त्याच्या नैसर्गिक सह-जीवनाच्या प्रदेशातले आहेत, त्यात कुठलाही उपरेपणा नाही. जगण्या-बोलण्यातली अभिन्नता हा या लेखनाच्या पात्रांचा विशेष आहे. इथे मातीची जीवापाड जपणूक करणारा शेतकरी भेटतो, तसाच आपल्या मनातल्या मूल्यांवर प्रेम करणारा एखादा वडापवाला देखील भेटतो. अतिशय गरिबीत देखील आपल्या गाईगुरांवर माया करणारी माणसे या कथांतून भेटत जातात. बरेचदा वाटते, ही कालबाह्य जीवन जगणारी माणसे आहेत. आपल्या जगण्याच्या ओढताणीत देखील स्वतःला भ्रष्ट होण्यापासून वाचवणारी गरीब माणसे याच काळाची आहेत, हे महादेव माने आपल्या लेखनातून हट्टाने सांगत जातो. तेव्हा लेखकाची कृषिजन मानसिकता ठळकपणे समोर येते. आनंद यादवांची ‘गोतावळा’ प्रकाशित झाली तेव्हा ही एका ‘युगांताची कहाणी’ म्हणून तिचा गौरव केल्या गेला. कादंबरीचा नायक नारबा, कादंबरीच्या अखेरीस शेतशिवार सोडून जाताना गावशिवेवर लघवी करतो आणि निघून जातो असे दृश्य आहे. झाडी तोडल्या गेली, गुरेढोरे विकल्या गेली, आता इथे राहून काहीही उपयोग नाही, या धारणेतून सालगडी असलेला नारबा बाहेर पडतो. सालगडी असणे ही त्याची संवेदना नसून ती आधिभौतिकाशी जोडली गेलेली आहे, हे तिथे कळते.
महादेव मानेंच्या कथांमधून वावरणारी पात्रे अशीच नारबाच्या विचारवृत्तीशी जोडलेली आहेत. अशी माणसे गाव शिवाराला व्यक्तिमत्त्व देत असतात. त्यातून गाव आणि शिवार दोन्हीही घडत जाते.

'वडाप' ही संग्रहातली पहिली कथा. सदू ड्रायव्हरची कथा. खूप ओढतानीत आपला संसार ओढणारा, वाचनाचं वेड असलेला हा माणूस. आपल्या मुलाच्या आजाराच्या कायम चिंतेत असणारा. अगदी मुळातून वाचावी अशी ही कथा. सदूचे चांगुलपण दारिद्र्याच्या अरिष्टात देखील कसे शाबूत रहाते हे सांगणारी ही कथा. ही कथा खेडयातल्या जगण्याची एका परीने समूहकथा देखील आहे. मर्तीकाला जाणाऱ्या बाया, कॉलेजातली मुलं, म्हातारी बाया माणसं सारं काही सोबत घेऊन येते. हा एक प्रकारे एका समूहाचा कल्लोळ वाटत जातो.
‘अडकित्ता ‘ ही भीमा नावाच्या एका तरुण शेतकऱ्याची कथा आहे. ‘माणूस माणसाला इसरलं पर माती न्हाय इसरत इमानाला. माती इमान राखती.’ हा या कथेचा शेवट. बदलत्या बाजार व्यवस्थेत देखील अडचणींवर मात करून हिकमतीने उभा रहाणारा हा शेतकरी. एका बाजूने ही हळद पिकवणाऱ्या एका कास्तकाराची यशकथा वाटावी अशी असली तरी ती सरधोपट होत नाही, कला म्हणून ती आपला बाज राखून असते.
‘आवशीद’ ही जावेदची कथा. मुळात जावेद हा द्राक्ष बागायत करणारा शेतकरी. द्राक्षबाग बुडाली तरी तो पराभूत न होता पपईची लागवड करतो. खूप कष्ट करून बाग फुलवतो. या बागेत राबणारे त्याचे कुटुंब. शेतकरी शेती उत्तम करतो, उत्तम माल पिकवतो पण बाजारात पराभूत होतो. जावेद त्याला अपवाद आहे. मार्केटिंग तंत्र अवगत करून तो ज्या रीतीने यशस्वी होतो, त्याची ही कथा आहे. मराठी साहित्यात मुस्लिम शेतकरी फार कमी पहायला मिळतो. माने यांच्या कथेतला जावेद हा खास मराठी शेतकरी त्यासाठी खूप मोलाचा वाटतो. शेतीतल्या अरिष्टाचे चित्र सर्वदूर आपल्याला पाहायला मिळत असताना माने यांनी अश्या काही अपवादांची नोंद कथाकार म्हणून घेणे महत्वाचे आहे.
सर्वसामान्यपणे मानेच्या कथेत जो जीवनाचा स्तर आला आहे तो खेड्यातील तळातल्या माणसांचा. त्यांच्या जीवनातले अनेक पेच माने वेगवेगळ्या रीतीने मांडत जातात. ‘सुरुंग’ सारख्या कथेत खूप जीवापाड जपलेली म्हैस एका अपघातात मरून जाते. म्हाळाप्पा सारखा शेतकरी कोलमडून पडतो. डोक्यावर कर्जाचा बोजा. म्हैस मेल्यानंतर तिच्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून तिला आपल्या मातीत पुरणारा हा शेतकरी. असे कितीतरी शेतकरीपणाचे स्वत्व जपत माने कथा लिहीत जातात. तसा म्हाळाप्पा हा एका बाजूने भूमीहीनांचा प्रतिनिधी असूनही मातीशी जोडलेला आहे. त्याचे तसे असणे हे त्याच्या जगण्याचे व्यापकत्वच आहे.
‘पाण’ सारखी कथा चारुता सागर आणि शंकर पाटील यांच्या सापावरील कथांची आठवण करून देणारे आहे. नागीण ही चारुता सागरांची कथा असो की भुजंग ही शंकर पाटलांची कथा. माने शेतकरी जीवनाला वेढून असणाऱ्या जीवसृष्टीची कथा लिहीत जातात. इथे मग नाग महत्वाचा उरत नाही, तर शेतकरी म्हणून असणारे अस्तित्व महत्वाचे ठरते. हे या कथेचे वेगळेपण आहे.
‘गिरीजा, आपली कुणब्याची जात. रानातल्या इच्चू किरड्याला भ्या खाऊन चालतंया का ?’ अश्या संवादातून या कथेचे वेगळेपण दिसते. ही कथा शेती, जीवसृष्टी आणि तिच्यात राबणारा कृषक यांचे नाते दाखवत जाते, केवळ भय दाखवत नाही.
‘वसप’ ही शीर्षक कथा, खऱ्या अर्थाने या संग्रहातील मध्यवर्ती कथा आहे. वसप म्हणजे झाडांच्या सावलीने पडीक राहणारे रान. भर रानात उभ्या असणाऱ्या बाभळीच्या असण्याने या कथेची सुरवात होते. मग शेती करण्यापेक्षा लाकूडतोडीचा व्यवसाय बरा, या धारणेतून या धंद्यात उतरलेला शेतकरी आणि त्याची मुलं. बुलेट घ्यायची स्वप्न त्याला पडू लागतात. लाकडं विकायची अन बुलेट घ्यायची.
या कथेतून झाडे, झाडांवरली पाखरे, शेत शिवार सारे सारे जिवंत होत जाते. शेती भोवती फिरणारा विनाश दिसत जातो. एका बाजूने शेती तोट्याची असणे हे एक सत्य आहे, दुसऱ्या बाजूने तात्कालिक हव्यासापोटी एक जीवन साखळी बेचिराख होताना दिसत आहे. हेच आजचे ग्रामवास्तव आहे, जे ही कथा समर्थपणे मांडत जाते.
‘लाकूड होऊन मरण्यापरास लाकूड तोडून जगल्यालं काय वाईट ?’ असा प्रश्न विचारणारा गणपा नावाचा शेतकरी ही एक बाजू आहे, तर ‘गणपा, शेतकऱ्याचा जलम रानात मूठभर धान ईस्कटून खंडीभर धान पिकवायचा. झाडं तोडुनी ? झाडातबी जीव हायच की ? झाडाचा सराप लय वाईट.’ असं बोलणारा केरु आबा ही दुसरी बाजू आहे. हा एका परीने नैतिकतेचा आणि जगण्याचा संघर्ष आहे. महादेव माने अतिशय नेमकेपणाने हा संघर्ष मांडत जातात. त्यावेळी अवघा गावशिवार उभा रहातो.
‘मेडकं’ ही कृष्णाकाठच्या पावसाची कथा. आपल्या जित्राबावर जीव लावणाऱ्या आकणा म्हातारीची कथा अशीच अस्वस्थ करणारी. याच विषयावर मधल्या काळात विजय जाधव यांची ‘पाऊसकाळ’ नावाची सुन्दर कादंबरी आलेली. दुष्काळ असो की नको तेवढा पाऊसकाळ, तिथल्या जगण्याची परवड थांबत नाही. माने या कथेतून ही परवड मांडत जातात. महापूर आल्यानंतरची या कथेतली वर्णने थक्क करून जातात. एका छोट्याश्या कथेत ही अवकाळी तोलून धरण्याचे कसब लेखकाने दाखवले आहे.
‘मेंढीकिडा’ ही मेंढी राखणाऱ्या संताची गोष्ट. जनावरे आणि माणसांचं नातं कथन करणारी ही कथा खूप अस्वस्थ करून जाणारी. ‘पंख छाटलेला गरुड’ आणि ‘भगदाड’ ह्या बाप आणि लेकीच्या नात्यावरील कथा. बालपणीच कॅन्सर झालेल्या मुलीची भगदाड ही कथा. मुलगी परसात व्यालेल्या कुत्रीच्या पिलाला जीव लावते. त्यामुळे तिचा वाढणारा आजार. बापाची सततची काळजी. मुलगी आता जगणार नाही हे समजल्यामुळे तिचे सगळे हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा बाप. या सगळ्यातून एक पिळवटून टाकणारा दुःखाचा आवेग माने कथेतून मांडत जातात. तशी ही माने यांची आत्मकथाच आहे. लेखकाने आपले दुःख पचवून लिहीत जाणे काय असते याचा एक उत्तम नमुना म्हणून या कथेकडे पहावे लागेल.

माने यांची कथा प्रायोगिक अंगाने विकसित होण्यापेक्षा पारंपरिक अंगाने विकसित होताना दिसते. आपला प्रदेश, भाषा, तिथली माणसे आणि जीवसृष्टी यांची प्रचंड ओढ या कथेला आहे. अतिशय समृद्ध अशी बोलीभाषा हे या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य. मराठी भाषेतील कथा साहित्यातील माडगूळकर, शंकर पाटील, चारुता सागर, राजन गवस, भास्कर चंदनशिव, उद्धव शेळके यांच्या कथा प्रवाहाला जोडून घेणारी ही कथा आहे. अलीकडे आसाराम लोमटे, कृष्णात खोत, अनिल साबळे, हंसराज जाधव, सीताराम सावंत असे काही कथा लेखक कथा लेखनाची हीच परंपरा पुढे नेताना, विकसित करताना दिसतात.

महादेव माने हा एकाच वेळी शेती, नोकरी आणि लेखन करणारा लेखक म्हणून उत्तम कथा देणारा लेखक ठरू शकतो. मानेंच्या या खऱ्या अर्थाने कृष्णाकाठच्या कथा आहेत. वाचकाला समृद्ध करणाऱ्या.

( ता. क. - ग्रंथालीने पुस्तक वाचताना पाने सुटी सुटी होऊ नये याची काळजी घेतली तर आनंद.)



( वसप, महादेव माने, ग्रंथाली, मुंबई.)
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |