दै . सकाळ, दै . लोकसत्तासह अनेक दैनिकांमध्ये दिर्घकाळ पत्रकारीता केलेले स्व . चैतन्य पैठणकर स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पाण्यासारखे पत्रकार होते . त्यांच्या निधनाने मी एक, सच्चा दोस्त, ज्येष्ट बंधू गमावल्याची भावना ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी बोलून दाखविली .
सुनिल भिंगे सर सतिश भिंगे या बंधुचे विविध क्षेत्रातील कार्य नेत्रदीपकच असल्याचा निर्वाळा यावेळी आटपाडीचे नगरसेवक रूषीकेश देशमुख, सादिक खाटीक रामभाऊ पाटील, दिनेश देशमुख, स . नि . पाटील, प्रा . विजय शिंदे, विलासराव खरात या मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिला .
मोफत वाचनालय , बी . ए . भिंगे अभ्यासिका विद्यानगर, स्वराज्य रिक्षा संघटना, जायंटस ग्रुप, पत्रकार समन्वय समिती या आटपाडी शहरातील संस्था संघटनाच्या वतीने संयुक्त कार्यक्रमात बोलताना सादिक खाटीक यांनी या भावना व्यक्त केल्या .
आपल्या गरीबीशी इमान ठेवून २५ वर्षे पत्रकारीता करणाऱ्या चैतन्य पैठणकर यांनी आटपाडी तालुक्याच्या शेकडो प्रश्नांवर आणि विशेषत : दुष्काळ पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न यावर सातत्यपूर्ण लिखाण केले . अतिशय शांत, संयमी, निगर्वी वृतीने जीवन अंगिकारलेले चैतन्य पैठणकर जुन्या, नव्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक, प्रेरकच होते. कधीही, कोणावरही न रागावता, मान अपमान सहन करीत आपल्या कार्याला हसतमुखाने सामोरे जाणारे चैतन्य पैठणकर हे एक दुर्मिळ व्यक्तीमत्व होते . मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पनात आनंदाने कसे जगायचे, हे चैतन्य पैठणकर यांनी आपल्या आयुष्यभराच्या वर्तनातून दाखवून दिले . या अष्टपैलु लक्षवेधी पत्रकार बंधूस मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. अशा शब्दात सादिक खाटीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .
दहावी बारावी परिक्षेत प्राविण्य दाखविलेल्या, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रज्ञावंताचा गौरव यावेळी करण्यात आला, त्या सर्वांनाही सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातुन शुभेच्छा दिल्या .
नगरसेवक रूषीकेश देशमुख यांनी, समाजभिमुख भूमिकेतून आम्ही सर्व भाजपाई आटपाडी शहराच्या विकासासाठी कार्यरत आहोत . आटपाडीतील सर्व ठिकाणच्या रिक्षा थांब्याचा प्रश्न सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरसिंहबापू देशमुख यांच्या आदेशातून प्रथम प्राधान्याने आम्ही सर्वांनी सोडविला आहे . येथे आलेल्या सर्व प्रज्ञावंताचे मी अभिनंदन करतो . असे स्पष्ट केले .
वाचन चळवळीचे दिनेश देशमुख यांनी अमरसिंहबापू देशमुख यांच्यामुळेच मला पुस्तक वाचण्याचा छंद लागल्याचे आणि त्यांच्या प्रेरणेतून राज्यभर गौरव होण्याची संधी मला लाभली . मला मिळालेल्या संधीतून आईला आनंदी करता आले . सर्वांनी पुस्तके वाचलीच पाहिजेत ही काळाची गरज बनली आहे . भिंगे बंधुच्या समाजभिमुख भुमिकेला प्रणाम . एस . एन . पाटील सर, सुनिल भिंगे सर, सादिक खाटीक यांनी पुढच्या पिढ्यांना आपल्या कार्याचा लेखाजोखा समजावा म्हणून स्वतःच्या जीवन कार्यावर पुस्तके लिहावीत अशा भावना दिनेश देशमुख यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या .
आपल्या सत्काराला उत्तर देताना विलासराव खरात, रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील, मराठा सेवा संघाचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रा . विजयराव शिंदे यांच्यासह मोफत वाचनालयाचे अध्यक्ष एस . एन . पाटील सर, अरविंद चांडवले, स्टार हेल्थ विम्याचे अधिकारी अतुल यादव इत्यादींची भाषणे झाली .
स्वागत प्रास्ताविक सुनिल भिंगे सर यांनी केले . सुत्रसंचालन जीवन पोळ यांनी केले . दिवंगत पत्रकार चैतन्य पैठणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायीक श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी सूर्यकांत दौंडे, एम. बी. गायकवाड सर, एम. बी. वाले, क्रांती न्युजचे संपादक सचिन मेनकुदळे इत्यादी अनेक मान्यवर विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्रज्ञावंत, गुणवंत, रिक्षा चालक मालक, ज्येष्ट नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . शेवटी आभार पिंटू पाटील यांनी मानले .