देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमती, ग्रामीण भागात निर्माण झालेली इंधन टंचाई तसेच केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज जत येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याची तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याचे सांगण्यात आले. अन्नधान्य, भाजीपाला, दूध, खाद्यतेल, बांधकाम साहित्य, औषधे तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असून ट्रॅक्टर, पंप, वाहतूक वाहने आणि विविध शेती अवजारे डिझेलवर अवलंबून आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पेरणी, मशागत आणि पाणीपुरवठ्यासारखी महत्त्वाची शेती कामे खोळंबली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केंद्र शासनावर जोरदार टीका केली. देशात महागाईचा भडका उडालेला असताना, बेरोजगारी वाढत असताना आणि शेतकरी व सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असताना केंद्र शासन जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना “मेलोडी” चॉकलेट देण्यात व्यस्त असून देशातील महागाई, इंधन दरवाढ आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलनस्थळी नागरिकांना “मेलोडी” चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले. “महागाई कमी करा”, “पेट्रोल-डिझेल दर कमी करा”, “जनतेला दिलासा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी “मेलोडी” चॉकलेट वाटप करून केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात प्रतीकात्मक निषेध नोंदवला.
यानंतर जतचे उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात पेट्रोल व डिझेलच्या वाढीव दरात तात्काळ कपात करावी, ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर करून नियमित पुरवठा सुरू करावा, शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून द्यावे, इंधनावरील कर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा तसेच वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
तसेच पेट्रोल पंपांवरील कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, इंधन साठेबाजी करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात महादेव ज्ञा. पाटील (अध्यक्ष, जत तालुका काँग्रेस कमिटी), बाबासाहेब कोडग, आप्पाराया बिरादार, सुजय (नाना) शिंदे, निलेश बामणे, महादेव कोळी, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, परशुराम सांगोलकर, जे. के. मामा माळी, जे. बी. पाटील, तुकाराम माळी, रविंद्र सावंत, प्रमोद सावंत, रावसाहेब मंगसुळी, राजकुमार भोसले, रमेश पाटील, बसवराज घेज्जी, मल्लेश आण्णा कत्ती, अशोक सलगर, गणेश जाधव, दयानंद मुचंडी, बाबासाहेब माळी, गणी मुल्ला, प्रकाश सावंत, मनोहर भोसले, धनाजी चव्हाण, रामचंद्र सरगर, अण्णाराव पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देऊन जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन महागाई कमी करावी, इंधन दरवाढ मागे घ्यावी व ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर करावी, अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.