हिंगणी येथील गावकऱ्यांचा दहिवडीत गट विकास अधिकाऱ्यांना इशारा
माण तालुक्यातील मौजे हिंगणी येथील 'गावठाण हद्द ते खांडेकरवस्ती' या ग्रामीण मार्ग १४४ वरील बेकायदेशीररी्या बांधलेली भिंत त्वरित पाडून रस्ता मोकळा करावा, अन्यथा आगामी ४ जून २०२६ पासून दहिवडी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा हिंगणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन गावकऱ्यांनी माणचे गट विकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले.याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगणी गावातील गावठाण हद्दीपासून खांडेकरवस्तीकडे जाणारा ग्रामीण मार्ग क्रमांक १४४ हा रस्ता गेल्या महिनाभरापूर्वी, म्हणजेच २८ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री काही अज्ञात इसमांनी रस्त्यावर बेकायदेशीरपणे पक्की भिंत बांधून कायमचा बंद केला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांची शेतातील कामे, येण्या-जाण्याचा मुख्य मार्ग आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या गंभीर समस्येबाबत गावकऱ्यांनी २९ एप्रिल २०२६ रोजीच लेखी तक्रार केली होती. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही. ग्रामस्थांनी वारंवार कार्यालयात चकरा मारल्या असता, ग्रामविकास अधिकारी आणि गट विकास अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या टोलवाटोलवीच्या कारभारामुळे संतप्त होऊन अखेर गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
"येत्या आठ दिवसांच्या आत संबंधित दोषी इसमांवर कायदेशीर कारवाई करून रस्ता खुला करण्यात यावा. जर ४ जूनपर्यंत रस्ता पूर्ववत न झाल्यास आम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू. उपोषण काळात कोणतीही जीवीत हानी किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहील.या निवेदनाची प्रत माहितीसाठी आणि तात्काळ कारवाईसाठी म्हसवड अप्पर तहसीलदार, दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि म्हसवड पोलीस स्टेशन यांनाही पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी अजित डोंगरे, महादेव शिकारे, नवनाथ शिकारे,चंद्रकांत खांडेकर,कुबेर खांडेकर, दिपक शिकारे,सोमनाथ डोंगरे, भारत डोंगरे यांच्यासह हिंगणी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.