विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
सोलापूर, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तीकेयन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कामाचा पीपीटीद्वारे आढावा सादर केला.
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले की, मतदार यादींच्या अचूकतेसाठी सुरू असलेल्या या मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि अपात्र नावे वगळणे हे उद्दिष्ट आहे. केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरभेटीदरम्यान नागरिकांकडून गणना फॉर्म तत्काळ भरून घ्यावेत तसेच आवश्यक कागदपत्रेही स्वीकारावीत. मतदार यादीतील विसंगती, चुकीची नावे किंवा अविवाहित मतदारांच्या नोंदींसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी. बीएलओ आणि सुपरवायझर यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात काही ठिकाणी एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंद असल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक घराचे क्रमांकन करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच नव्याने 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नावे मतदार यादीत नोंदवून घेण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा व 2 लोकसभा मतदारसंघ असून एकूण मतदारसंख्या 39 लाख 46 हजार 781 आहे. त्यामध्ये 20 लाख 10 हजार 948 पुरुष, 19 लाख 35 हजार 505 महिला आणि 328 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 3723 मतदान केंद्रे कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील 77 हजार 86 ब्लर फोटो व चुकीच्या नोंदींपैकी 72 हजार 648 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणांवर काम सुरू आहे. आतापर्यंत 32 लाख 83 हजार 811 मतदारांचे सखोल पुनरिक्षण पूर्ण झाले असून हे प्रमाण 83.20 टक्के इतके आहे. ग्रामीण भागात 87.20 टक्के तर शहरी भागात 72.67 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 616 मतदार असून 25 मे ते 2 जून दरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले.