धुराचे लोट उसळताच नागरिकांची धावपळ ; अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला
ईश्वरपूर शहरातील गजबजलेल्या गांधी चौक मुख्य बाजारपेठेत आज दुपारी चारच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन व्यापारी बंधूंच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. श्री संतोष ढबू आणि महावीर ढबू यांच्या स्वतंत्र दुकानांच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर अचानक मोठमोठे धुराचे लोट उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.क्षणार्धात आग भडकत संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेला. दोन्ही दुकानांमध्ये भडंग, फरसाण, कुरकुरे, शेंगदाण्याचे स्नॅक्स, चॉकलेट, बिस्किटे तसेच पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कॅरीबॅग व इतर माल मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी व नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत दुकानातील शक्य तितका माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ईश्वरपूर नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचे मोठे फवारे मारून आग आटोक्यात आणली.
मात्र आग विझवण्याच्या प्रयत्नात दुकानातील बहुतांश माल पूर्णपणे भिजल्याने तो खराब झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ढबू बंधू हे परिसरात अतिशय मनमिळावू व चांगल्या स्वभावाचे व्यापारी म्हणून परिचित असल्याने त्यांच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.