रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाढला धोका; आटपाडीत तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी
👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी |
📅
05 May 2026 |
👁 232 Views
दैनिक आखुर | आटपाडी : आटपाडी नगरपंचायत हद्दीत वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, याविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागांवर तसेच मुख्य व बायपास रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अतिक्रमणांमुळे वारंवार अपघात होत असून, अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या लो. आण्णाभाऊ साठे चौक ते साई मंदिर या मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच रस्त्यांच्या कडेला झालेल्या अतिक्रमणांमुळे अपघातांची शक्यता अधिकच तीव्र झाली असून, नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवण्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन नगराध्यक्ष यु. टी. जाधव, उपनगराध्यक्ष मिनाक्षी पाटील, पाणीपुरवठा सभापती डॉ. जयंत शिवाजीराव पाटील, भाजप गटनेते ऋषिकेश देशमुख, नगरसेवक पै. अजित जाधव, महेश देशमुख तसेच नगरसेविका मनिषा आबासाहेब पाटील, राधिका शशिकांत दौंडे, ललिता अशोक जाधव यांनी दिले आहे.