महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या अमोघ कर्तृत्वाने गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे आणि सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (LCB) कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विशेष ओळख निर्माण करणारे पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. विश्वास शिंगाडे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदी खात्यांतर्गत पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीसह त्यांची आता ठाणे शहर येथे नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या पदोन्नतीने सातारा पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
२०१५ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी 'खाकी'चे स्वप्न पूर्ण:
अथक परिश्रम आणि प्रामाणिक कर्तव्याच्या बळावर सन २०१५ मध्ये, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी श्री. विश्वास शिंगाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली होती. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पुणे मार्केट यार्ड येथे आपल्या उत्कृष्ट सेवेला सुरुवात केली.
गडचिरोलीत शौर्य आणि केंद्र सरकारचे बहुमान:
त्यानंतर अत्यंत दुर्गम, खडतर आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोली नक्षलवादी भागात त्यांनी २०१७ ते २०२१ या कार्यकाळात देशसेवेचे आणि पोलीस दलाची मान उंचावणारे अत्यंत प्रभावी काम केले. या काळात नक्षलवाद्यांशी दोन हात करत असतानाच त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना केंद्र सरकारचे 'आंतरिक सुरक्षा पदक', 'विशेष सेवा पदक' आणि 'खडतर सेवा पदक' देऊन गौरविण्यात आले आहे. आपल्या आतापर्यंतच्या पोलीस सेवेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरीची ३०० पेक्षा जास्त बक्षिसे पटकावली आहेत.
सातारा एलसीबीमध्ये क्लिष्ट गुन्ह्यांची उकल; कोल्हापूर परिक्षेत्रात 'विश्वासू' नाव!
गडचिरोलीतील यशस्वी कार्यकाळ संपल्यानंतर ते सातारा पोलीस दलात रुजू झाले. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (LCB) कार्यरत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट, गंभीर आणि आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावला. गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारे आणि सर्वसामान्यांना न्याय देणारे एक प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस खात्यामध्ये एक अत्यंत 'विश्वासू आणि प्रामाणिक' अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
येलमरवाडीचे सुपुत्र; बालपणीचा संघर्ष:
श्री. विश्वास शिंगाडे हे मूळचे कातर खटाव जवळील येलमरवाडी (तालुका खटाव, जिल्हा सातारा) येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब शेतकरी पार्श्वभूमीचे आहे. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, बालपणापासूनच प्रत्येक आव्हानाला तोंड देत त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. आज त्यांच्या पोलीस दलातील प्रभावशाली कामगिरीने येलमरवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सर्वसामान्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव:
पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेची पावती म्हणून त्यांना मिळालेल्या या खात्यांतर्गत पदोन्नतीबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांकडूनच त्यांच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.