शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांना मोठी संधी; मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी 30 मेपर्यंत अर्ज मागविले
👤 अतुल फसाले |
📅
24 May 2026 |
👁 285 Views
सोलापूर, दि.22 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, करडई आणि सूर्यफूल या पिकांसाठी समूह आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी मूल्य साखळी भागीदार (VCP) निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि सहकारी संस्थांनी 30 मे 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत जिल्हा तेलबिया अभियान समितीमार्फत निवड करण्यात आलेल्या मूल्य साखळी भागीदारांद्वारे शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा, माती परीक्षण, सीड हब, ब्लॉक प्रात्यक्षिके, काढणीनंतर सुविधा सहाय्य तसेच कृषी मॅपरवर लाभार्थ्यांची माहिती भरणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड होण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था ही कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यानुसार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ज्या तालुक्यात समूह तयार झाला आहे, त्या ठिकाणी संस्थेचा किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. यासाठी संस्थेची नोंदणी मार्च 2023 पूर्वीची असणे बंधनकारक आहे.
तसेच संबंधित संस्थेमध्ये किमान 200 शेतकरी सदस्य नोंदणीकृत असावेत. सहकारी संस्था असल्यास त्यांच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांबाबत कामकाजाचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल किमान 9 लाख रुपयांपेक्षा अधिक असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रुपयांचा समभाग असणेही आवश्यक आहे.
कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत संस्था, शासन अनुदानित शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा सहकारी संस्था तसेच 10 हजार शेतकरी उत्पादक संघ (FPOs) योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या संस्था, NAFED व NSC-OS यांच्याकडे नोंदणीकृत तेलबिया संबंधित संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इच्छुक संस्थांनी सोयाबीन, सूर्यफूल आणि करडई या प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज कंपनीच्या लेटरहेडवर संचालक मंडळाच्या ठरावासह व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत. अर्जाचा नमुना सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.