मुंबईतील शिवस्मारकाच्या कामास सुरुवात करण्यासाठी आटपाडीत १५ दिवसांपासून धरणे आंदोलन

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 07 May 2026 | 👁 229 Views
मुंबईतील शिवस्मारकाच्या कामास सुरुवात करण्यासाठी आटपाडीत १५ दिवसांपासून धरणे आंदोलन
१५ दिवसांपासून संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू; विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा
समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन होऊन जवळपास दहा वर्षे उलटून गेली, तरी अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 23 एप्रिल 2026 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आटपाडी नगरपंचायत इमारतीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व महेशकुमार पाटील करत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. आटपाडी तालुका नाभिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, चौंडेश्वरी पतसंस्था आटपाडी, आटपाडी विणकर सोसायटी यांसह अनेक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन दर्शविले आहे. तसेच शेकडो शिवप्रेमी आणि सर्व समाजातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, मुंबई ही महाराष्ट्राची तसेच देशाची आर्थिक राजधानी असून, समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी भूमिपूजन झाले, त्याच ठिकाणी हे स्मारक उभारले गेले पाहिजे. जगभरात समुद्रात अनेक मोठे प्रकल्प उभे राहत असताना या स्मारकासाठी तांत्रिक किंवा परवानगीसंदर्भातील अडथळे कारणीभूत ठरू शकत नाहीत, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
महेशकुमार पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व समाजघटक, संघटना, पक्ष आणि शिवप्रेमींना आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा सरकारविरोधात नसून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकाला न्याय मिळावा आणि शिवरायांचा सन्मान वाढावा यासाठी सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असला तरी अनेक लोकप्रतिनिधी आणि जबाबदार नेत्यांनी अद्याप आंदोलनाची दखल घेतलेली नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. “आटपाडीमध्ये येऊनही काही आमदार, खासदार किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांत कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने आंदोलनाची विचारपूस केलेली नाही,” असा आरोपही करण्यात आला.
उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात, 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणाऱ्या उकाड्यात आंदोलनकर्ते ठिय्या देऊन आंदोलन सुरू ठेवत आहेत. स्मारकाच्या कामास तातडीने सुरुवात करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा शासनाकडे केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |