धरण उशाला, घशाला कोरड! आदर्श तिगावची पाण्यासाठी परवड

👤 संकेत सानप मुंबई | 📅 14 May 2026 | 👁 313 Views
धरण उशाला, घशाला कोरड! आदर्श तिगावची पाण्यासाठी परवड
संगमनेर तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख असलेल्या तिगाव गावाला भीषण पाणीटंचाईच्या झळा बसत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी परवड सहन करावी लागत आहे. मागील चार वर्षांत गावाने विकासाची अनेक पावले उचलली असली, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र आजही ऐरणीवरच आहे.
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या काळात मंजूर झालेली १६ गाव पाणीपुरवठा योजना आजही केवळ कागदावरच सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. गेल्या एका वर्षापासून नागरिकांकडून नियमित पाणीपट्टी वसूल करण्यात येत असतानाही, योजनेचे वीज बिल थकीत असल्याने योजना बंद अवस्थेत आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. तालुक्यातील विविध गावांतील गंभीर पाणी समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, जलजीवन मिशन अंतर्गत काही ठिकाणी कामे अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी योजना अद्याप पोहोचल्याच नसल्याचे निदर्शनास आले. ज्या भागांत पाणी उपलब्ध नाही, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेत, पूर्ण झालेल्या कामांच्या चाचण्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. काही गावांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींवरून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचे कडक आदेशही यावेळी देण्यात आले.
जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अडथळे येत असल्यास स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांसह गावागावांत प्रत्यक्ष पाहणी करून अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, “आदर्श गाव” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिगावला अखेर शाश्वत पाणीपुरवठा कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आमदार अमोल खताळ पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |