सहकार समृद्धी हीच आर्थिक विकासाची महत्त्वाची दरी मा मंत्री बाळासाहेब थोरात साहेब
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाच्या प्रारंभासाठी आज पहिल्या मिल रोलर शुभारंभाचे पूजन करण्यात आले. तसेच डिस्टलरी प्रकल्पाने तब्बल १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल उत्पादनाचा उच्चांकी आणि यशस्वी टप्पा पार केल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून मद्यनिर्मिती केली जाते. मात्र सहकारमहर्षी तिर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारसरणी, शिस्त आणि मूल्यांचा वारसा जपत थोरात सहकारी साखर कारखान्यात मद्यनिर्मिती न करता इंडस्ट्रियल अल्कोहोलचे उत्पादन केले जाते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपत कारखान्याने सातत्याने प्रगतीची वाट धरली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायम उच्चांकी भाव देण्याची परंपराही जपली आहे.
वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याला मोठे बळ मिळत आहे. जागतिक पातळीवरील बदलत्या परिस्थितीमुळे आणि युरोपियन देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून इथेनॉलचे महत्त्व आज संपूर्ण जगाला पटले आहे. आपल्या देशातही पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल हा प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे.
इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारने रास्त आणि प्रोत्साहनपर दर निश्चित करून दिले पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांघिक प्रयत्न, शिस्तबद्ध नियोजन आणि सहकाराच्या बळावर कारखान्याची ही यशस्वी वाटचाल भविष्यातही अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी व्यक्त केला