कापूस आणि धान्य खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत; 'महाराष्ट्र शेतकरी संघटने'ची प्रशासनाकडे मागणी*
👤 शुभम सुराणा जळगाव |
📅
20 November 2026 |
👁 8 Views
विषेश प्रतिनिधी भडगाव
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी, या मागणीसाठी 'महाराष्ट्र शेतकरी संघटना' आणि 'उत्तर महाराष्ट्र जलपरिषद' यांच्या वतीने भडगाव तहसीलदार कार्यालयामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष श्री. अभिमन राघो हाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. ना. श्री. जयकुमार रावल, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, आमदार अमोल चिमणरावजी पाटील आणि आमदार किशोर धनसिंग पाटील यांच्याकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
*सीसीआय (CCI) कापूस खरेदी केंद्र सुरू करणे:* ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येण्यास सुरुवात होते. मात्र, शासकीय खरेदी केंद्रे वेळेवर सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागतो. शेतकऱ्यांचा माल संपल्यानंतर ही केंद्रे सुरू होतात, ज्याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होतो. त्यामुळे चालू हंगामासाठी सीसीआय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे.
*शेतकी संघाचे धान्य व कडधान्य खरेदी केंद्र:* खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी, गहू आणि सर्व प्रकारच्या कडधान्यांची खरेदी करण्यासाठी शेतकी संघाचे खरेदी केंद्र त्वरित कार्यान्वित करण्यात यावे.
आयात शुल्क हटवण्याची मागणी: शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी वाढवण्यात आलेले आयात शुल्क तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
*दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार:* यंदा अपुऱ्या पावसामुळे १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचे उत्पन्न घटले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा प्राधान्याने विचार करून दिलासा द्यावा.
या निवेदनाची प्रत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील प्रकाश देवरे (पाटील) आणि उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. विकास मुकुंदराव पाटील यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष अभिमन राघो हाटकर यांच्यासह शहर अध्यक्ष प्रदीप हिलाल महाजन, उपाध्यक्ष भगवान नारायण चौधरी, कार्याध्यक्ष सुभाष दयाराम ठाकरे, माहिती प्रमुख कन्हैयालाल पुंजू महाजन, खजिनदार विनोद शांताराम चौधरी, सचिव समाधान भगवान भिल, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक बाबुराव भदाणे, महासचिव नाना किसन पाटील, सल्लागार विजय दोधा पाटील आणि आरोग्य प्रमुख मनोज सुभाष परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.