ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक
👤 घनसावंगी प्रतिनिधी :- किशोर मोरे |
📅
17 November 2026 |
👁 127 Views
घनसावंगी :दिवाळी म्हटले की घराघरांत आनंदाची लगबग, अंगणात रांगोळी, दारात आकाशकंदील, पणत्यांची रोषणाई आणि फराळाचा सुगंध दरवळतो. मात्र, उदरनिर्वाहासाठी गाव, घर आणि आप्तस्वकीयांपासून दूर ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या पालावर सणाचा आनंद काहीसा हरवलेला असतो. अशा कष्टकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावरही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून स्वरा फाउंडेशनच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उमेश जाधव यांनी स्वतः मजुरांच्या पालावर जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्याशी संवाद साधत दिवाळी फराळाचे वाटप केले. सणासुदीच्या काळातही दोन वेळच्या भाकरीसाठी उसाच्या फडात अहोरात्र कष्ट करणाऱ्या मजुरांसाठी हा उपक्रम आनंदाचा ठरला. फराळ मिळाल्यानंतर मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान, तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.दिवाळी म्हणजे केवळ स्वतःच्या घराची सजावट, रोषणाई आणि गोडधोड नव्हे, तर समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याचा सण आहे. समाजाच्या आर्थिक घडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्वरा फाउंडेशनचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.समाजसेवा ही केवळ शब्दांतून नव्हे, तर गरजूंच्या जवळ जाऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यातून सिद्ध होते. मजुरांच्या पालावर पोहोचलेला दिवाळी फराळ हा केवळ गोडधोड पदार्थांचा वाटप कार्यक्रम नव्हता, तर कष्टकरी कुटुंबांप्रती आपुलकी आणि माणुसकी जपणारी भेट ठरली.या उपक्रमावेळी पत्रकार अविनाश घोगरे, डॉ. मुकुंद जाधव, गौरव वराडे, अमोल आधे, राम खाडे, शंकर महाराज टोटे, किशोर मोरे, शुभम कोरडे, भास्कर नरवडे यांच्यासह स्वरा फाउंडेशनचे सहकारी सदस्य उपस्थित होते.ऊसतोड मजुरांच्या पालावर दिवाळीचा आनंद पोहोचविणाऱ्या स्वरा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, दिवाळीच्या प्रकाशासोबत माणुसकीचा सुगंधही समाजात दरवळला पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.