*जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात*

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 02 November 2026 | 👁 28 Views
*जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात*
विशेष प्रतिनिधी जळगाव
ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाच्या बिलावर स्वाक्षरी करून ते पुढील मंजुरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सतीष मनसुलाल शिसोदे (वय ५५, रा. आदर्शनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या वर्ग-१ उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तर भागवत वसंता चवरे (वय ३२) असे वर्ग-३ मधील कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

रस्ता काँक्रीटीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे ९ लाख ९० हजार ७६३ रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाची मोजणी पुस्तिका (एमबी) तयार करणे आणि बिल बनविण्याच्या प्रक्रियेसाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वीच तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेतल्याची माहिती आहे.

त्यानंतर तयार झालेल्या बिलांना पुढील मंजुरी मिळविण्यासाठी तक्रारदार संबंधित कार्यालयात गेले होते. यावेळी कनिष्ठ अभियंता चवरे यांनी बिलावर स्वाक्षरी करून ते उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे पुढील मंजुरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या १.५ टक्क्यांप्रमाणे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित कार्यालयात लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी तडजोडीनंतर १ टक्के प्रमाणे १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची माहिती आहे.

कनिष्ठ अभियंत्याने पैसे स्वीकारले; अधिकाऱ्याने स्वतःकडे घेतले

त्यानुसार सोमवारी एसीबीच्या पथकाने संबंधित कार्यालयात सापळा रचला. यावेळी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे दिली. शिसोदे यांनीही ती रक्कम स्वतःकडे घेतल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेत लाचेची रक्कम जप्त केली.

अंगझडतीत रोख रक्कम आणि महागडे मोबाईल

कारवाईदरम्यान दोन्ही संशयितांची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे आयफोन आणि ९१ हजार ६२० रुपये रोख रक्कम आढळून आली. तर कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल आणि २० हजार ६०० रुपये रोख रक्कम मिळून आली.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबारच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. ग्रामपंचायतीच्या विकासकामाच्या बिलासाठी लाच मागितल्याच्या या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! |