या हल्ल्यात एकनाथ भोयर (रा. बांदी, ता. रामटेक) हे वनमजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रकाश जयपत परतेती (रा. बोरडा, ता. रामटेक) असे आरोपीचे नाव असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील सागवान लाकडाची तोड करून चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनमजूर एकनाथ भोयर यांनी आरोपीला जाब विचारला. तसेच मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने दोन्ही हातांवर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वनमजुराला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.