जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी

👤 शुभम सुराणा | 📅 21 October 2026 | 👁 27 Views
जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून  तरुणाची हत्या, एक जखमी
जळगाव शहरातील महामार्गालगत असलेल्या माउली नगर परिसरात दांडिया खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाइट चमकवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाले. या वादातून चॉपरने छातीवर वार करून किरण विठ्ठल पाटील (वय ४०) यांची हत्या करण्यात आली, तर किशोर छगन पाटील (वय ४६) हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी किशोर पाटील यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे माउली नगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दांडिया सुरू असताना हेडलाइटवरून वादाला सुरुवात

माउली नगर येथील टीव्ही टॉवर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा मंडळाच्या वतीने गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील महिला आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, दुचाकीवरून तीन तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी दांडिया खेळणाऱ्या महिलांच्या दिशेने दुचाकीचा हेडलाइट चमकवल्याने महिलांनी त्यांना याबाबत जाब विचारला.

याच कारणावरून संबंधित तरुणांनी शिवीगाळ करत वाद घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला हा वाद पुढे वाढत गेला. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद शांत होण्याऐवजी त्याला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले.

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघांवर हल्ला

वाद सुरू असताना पराग नावाच्या व्यक्तीशी एका संशयिताचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान एका संशयिताने हात उचलल्याची माहिती समोर आली. हा प्रकार पाहून किरण विठ्ठल पाटील आणि किशोर छगन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाद अधिक चिघळला. याचवेळी एका संशयिताने खिशातून चॉपर काढून किरण पाटील यांच्या छातीवर वार केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. छातीवर गंभीर वार झाल्याने किरण पाटील जमिनीवर कोसळले. याच हल्ल्यात किशोर पाटील यांच्या छातीच्या मध्यभागीही चॉपरने वार करण्यात आला.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू; जखमीवर उपचार सुरू

हल्ल्यानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, किरण विठ्ठल पाटील यांचा या घटनेत मृत्यू झाला. किरण पाटील हे सुप्रीम कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे, किशोर छगन पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन संशयितांची नावे समोर; पोलिसांची शोधमोहीम

या प्रकरणात मयूर जाधव, रोहित पाटील आणि अन्य एका संशयिताचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी तसेच जीएमसी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संशयितांना शोधून काढण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

किरकोळ वादाचे रक्तरंजित हत्याकांडात रूपांतर

नवरात्रोत्सवाच्या काळात गरबा-दांडियाचा कार्यक्रम सुरू असताना दुचाकीच्या हेडलाइटवरून झालेल्या वादात एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याने माउली नगर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही वाद हिंसक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष | *जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर मोठा अपघात तीन चुलतभावांचा मृत्यू….* | सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे : प्रचारसभेत आवाहन | रामटेकमध्ये श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न; सकल हिंदू समाजाचा पुढाकार | आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश | शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन |