ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
👤 संतोष एडके तासगाव |
📅
19 October 2026 |
👁 95 Views
ईश्वरपुरातील बंद पडलेल्या जलतरण तलावासमोर विनापरवाना पिस्तूल घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. अबुबकर हारुणरशीद मणेर (वय २६, रा. मणेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस, असा एकूण ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने कारवाईची मोहीम राबवली.
या दरम्यान पोलीस हवालदार हणमंत लोहार आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश संकपाळ यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपी पिस्तूल घेऊन जलतरण तलावासमोर थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत निगराणी केली. संशयिताची ओळख पटताच दोन पंचांच्या उपस्थितीत त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या पँटच्या मागील बाजूस देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले.
पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वस्तू पंचांसमक्ष जप्त केल्या. पिस्तूल स्वतःच्या सुरक्षिततेसाठी विकत घेतल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार हणमंत लोहार यांच्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली,
यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली, सहा पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, हणमंत लोहार, अतुल माने, अरुण पाटील, संकेत कानडे स्था.गु.अ.शाखा, सांगली. पोकॉ. विजय पाटणकर, सायबर पोलीस ठाणे, सांगली.
पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करीत आहेत.
आरोपी मणेर हा रेकॉर्डवरील असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी आर्म अॅक्ट आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध अशी मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्पष्ट केले.