भडगाव : भडगाव तालुक्यातील पिचर्डे तसेच परिसरातील विविध गावांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची महसूल विभागाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत संबंधित अधिकारी पिचर्डे तलाठी योगेश पाटील व ग्रामसेवक रविंद्र शेळके, इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी पिचर्डे गावातील माजी पोलीस पाटील हेमराज महाजन माजी उपसरपंच विनोद बोरसे,विजय महाजन, शेतकरी सुनील पाटील विकास महाजन प्रमोद पाटील,अभिमन पाटील,मदन पाटील,अनिल महाजन योगेश महाजन,भुषण येवले, अमोल पाटील अक्षय येवले यांच्या सह शेतकरी गावातील शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करत असून कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करण्यात येत आहेत.
यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण व पावसातील खंड यामुळे अनेक भागातील खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. विशेषतः सोयाबीन, कपाशी, ज्वारी तसेच इतर पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन काही ठिकाणी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महसूल विभागाच्या पथकांकडून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पिकांचे नुकसान व उत्पादनावर झालेला परिणाम याची पाहणी केली जात आहे. पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करण्यात येत असून शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
पिचर्डे परिसरातील शेतकऱ्यांनी पंचनामे तातडीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत, पीकविमा भरपाई व आवश्यक सवलती मिळाव्यात, अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, महसूल विभागाकडून सुरू असलेल्या पंचनाम्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, शासनाकडून पुढील मदतीकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.