ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
ईश्वरपूर शहरात काही वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात आणि लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. पेठ-सांगली रस्त्याच्या कामाचे कारण देत बंद करण्यात आलेले हे सिग्नल पुन्हा सुरू करण्याकडे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सकाळी आणि संध्याकाळी शाळा भरते आणि सुटते त्यावेळी याच मार्गावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. सिग्नल बंद असल्याने त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. कोणताही मोठा अनर्थ घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? "आमचा जीव गेल्यावर सिग्नल चालू करणार आहे का?" असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जनतेच्या कराच्या रकमेतून उभारलेली ही यंत्रणा अशा प्रकारे बंद ठेवणे म्हणजे शासकीय निधीचा अपव्यय आहे. नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस वाहतूक शाखेने याची तात्काळ दखल घेऊन सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे