जागतिक शालेय अंडर-१८ व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पाचवा क्रमांक

👤 गणेश डेंगळे अहिल्यानगर | 📅 22 July 2026 | 👁 288 Views
जागतिक शालेय अंडर-१८ व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पाचवा क्रमांक
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक गौरव डेंगळे यांची उल्लेखनीय कामगिरी
चीनमधील शांगलुओ येथे आयोजित जागतिक शालेय अंडर-१८ व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत जागतिक स्तरावर पाचवा क्रमांक पटकावला. बलाढ्य देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जागतिक व्हॉलीबॉलमध्ये भारताची ताकद अधोरेखित केली.
या स्पर्धेत कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक तथा राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक गौरव अरविंद डेंगळे यांनी भारतीय मुलांच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्र राज्यासाठी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
जागतिक स्पर्धेत भारतासह तुर्की, ग्रीस, चीन, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, चायनीज तैपेई, इस्रायल, बल्गेरिया, हाँगकाँग, सौदी अरेबिया, चिली, डेन्मार्क आदी अनेक बलाढ्य देशांनी सहभाग नोंदविला होता. भारतीय पथकात १४ मुलगे, १४ मुली तसेच प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, फिजिओ यांच्यासह एकूण ३७ सदस्यांचा समावेश होता.स्पर्धेपूर्वी ७ जून ते ३० जून या कालावधीत झारखंडमधील रांची येथील ताना भगत इंडोर स्टेडियममध्ये भारतीय संघाचे २२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिरात खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्ती, तांत्रिक कौशल्य, मानसिक तयारी, संघभावना, शिस्त, सामन्यांतील रणनीती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
स्पर्धेत भारतीय मुलांचा संघ अत्यंत कठीण गटात होता. साखळी फेरीत भारताने डेन्मार्क, ब्राझील आणि बल्गेरिया या बलाढ्य संघांवर सलग विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जागतिक दर्जाच्या तुर्की संघाविरुद्ध भारताने झुंजार लढत दिली. विजय हुकला असला तरी भारतीय खेळाडूंच्या जिद्दीच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्यानंतर पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यांमध्ये भारताने बेल्जियम आणि जर्मनीसारख्या मजबूत संघांवर विजय मिळवत स्पर्धेत पाचवे स्थान निश्चित केले. भारतीय शालेय व्हॉलीबॉलच्या इतिहासातील ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
स्पर्धेदरम्यान भारतीय पथकाला चीनमधील शैक्षणिक व क्रीडा व्यवस्थेचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. शांगलुओ शहरातील स्वच्छता, नियोजन, शिस्त आणि आधुनिक नागरी सुविधा विशेष लक्षवेधी ठरल्या. विशेषतः शाळांमधील क्रीडा संस्कृतीने भारतीय पथकावर मोठा प्रभाव टाकला.जवळपास प्रत्येक शाळेत आधुनिक इंडोर व्हॉलीबॉल कोर्ट, अत्याधुनिक क्रीडा साहित्य, प्रशिक्षित प्रशिक्षक आणि उत्कृष्ट क्रीडा सुविधा उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतरही मोठ्या संख्येने विद्यार्थी नियमित सराव करताना दिसत होते.स्पर्धेदरम्यान विविध देशांच्या संघांना चीनमधील सरकारी शाळांना भेट देण्याची संधीही देण्यात आली. आधुनिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा, समृद्ध वाचनालये आणि जागतिक दर्जाची क्रीडा संकुले पाहून भारतीय प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रातील चीनच्या यशामागे शालेय स्तरावरील भक्कम पायाभरणी असल्याचे स्पष्टपणे जाणवले.
या अनुभवाविषयी सहाय्यक प्रशिक्षक गौरव डेंगळे म्हणाले, "जागतिक स्तरावर यश मिळवण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते. त्यासाठी दर्जेदार सुविधा, वैज्ञानिक प्रशिक्षण, सातत्यपूर्ण नियोजन आणि क्रीडेला दिलेले प्राधान्य तितकेच महत्त्वाचे असते. भारतातही प्रत्येक शाळेत दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण झाल्या, विद्यार्थ्यांना नियमित खेळासाठी वेळ मिळाला आणि पालकांनी क्रीडेलाही शिक्षणाइतकेच महत्त्व दिले, तर भारत निश्चितच जागतिक व्हॉलीबॉलमध्ये अव्वल स्थान मिळवू शकतो."श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावातील मातीच्या मैदानावर सुरू झालेला एका प्रशिक्षकाचा प्रवास आज भारताच्या तिरंग्याखाली जागतिक स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे.भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |